आतापर्यंत पाच वेळा विश्वविजेतेपद पटकावणाऱ्या विश्वनाथन आनंदचा बिलबाओ मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेतील पहिल्या फेरीत हॉलंडच्या अनिष गिरीशी सामना होणार आहे. ४६ वर्षीय आनंदला २१ वर्षीय गिरीविरुद्ध विजय मिळवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. गिरी हा भक्कम बचावात्मक चाली करण्याबाबत विशेष ओळखला जातो. त्यापाठोपाठ त्याला २२ वर्षीय वेस्ली सो (अमेरिका) व २३ वर्षीय लिरेन दिंग (चीन) यांच्याशी खेळावे लागेल. या खेळाडूंविरुद्ध खेळताना वयाच्या अंतराचा मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे. दिंग हा अनपेक्षित चाली करीत प्रतिस्पर्धी खेळाडूला संभ्रमात टाकण्याबाबत ख्यातनाम मानला जातो. या स्पर्धेतील गुणांकरिता सोफिया नियमावलीचा उपयोग केला जाणार आहे. त्यानुसार डाव जिंकणाऱ्या खेळाडूला तीन गुण, तर बरोबरीसाठी एक गुण मिळेल. डाव बरोबरीत ठेवण्याचा निर्णय पंचांच्या मदतीने घ्यावा लागणार आहे. पहिल्या ४० चालींकरिता ९० मिनिटे वेळ मिळणार आहे. ४१ व्या चालीनंतर प्रत्येक चालीकरिता दहा सेकंद वेळ मिळणार आहे. गतवेळी आनंदने या स्पध्रेत ११ गुणांसह अजिंक्यपद मिळविले होते. लिव्हॉन आरोनियनने दहा गुणांसह दुसरे स्थान मिळवले होते.