Anaya Bangar Meets Sarfaraz Khan: आर्यन बांगरने गेल्या वर्षी हार्मोनल रिप्लेसमेंट थेरपी केली आणि आर्यन बांगरची अनाया बांगर झाली. या थेरपीनंतर तिने अनाया बांगर, अशी आपली नवी ओळख निर्माण केली आहे. काही महिने ती परदेशात होती; मात्र आता ती मायदेशात परतली आहे. भारतात आल्यानंतर तिने आपला सहखेळाडू आणि बालपणीचा मित्र सरफराज खानची भेट घेतली आहे. दोघांच्याही इन्स्टाग्राम अकाउंटवर या भेटीचे फोटो शेअर करण्यात आले आहेत.
अनाया बांगरची सरफराजच्या कुटुंबाला भेट
भारताचा विस्फोटक फलंदाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सरफराज खानने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, अनाया बांगर आणि सरफराज खान त्याच्या गाडीच्या छतावर बसले आहेत. तसेच त्याचे वडील ड्रायव्हिंग सीटवर आहेत.
या खास भेटीचे फोटो शेअर करण्यासह त्याने एक जुना फोटोदेखील शेअर केला आहे. या जुन्या फोटोमध्ये आर्यन बांगरसह सरफराज खानचा भाऊ असल्याचे दिसत आहे. त्यासह त्याने आणखी एक व्हिडीओदेखील शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, अनाया बांगर सरफराज खानच्या मुलाला खेळवताना दिसून येत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तसेच क्रिकेट चाहते या व्हिडीओवर प्रतिक्रियांचा पाऊस पाडत आहेत.
सरफराज खान, मुशीर खान व अनाया बांगर तिघेही खूप चांगले मित्र आहेत. तिघांनीही एकत्र क्रिकेटचा सराव केला आहे. तिघेही एकत्र क्रिकेट खेळायचे. तिने हा व्हिडीओ शेअर करीत मुशीर खानलादेखील टॅग केले आहे. या व्हिडीओला कॅप्शन देत तिने ‘मिस यू मुशीर खान’, असं लिहिलं आहे. मुशीर खान सध्या आयपीएल २०२५ स्पर्धा खेळण्यात व्यग्र आहे. या हंगामासाठी झालेल्या मेगा लिलावात पंजाब किंग्जने बोली लावत त्याला आपल्या संघात स्थान दिले आहे. त्यामुळे त्याची भेट होऊ शकली नाही. तर दुसरीकडे सरफराज खान या मेगा ऑक्शनमध्ये अनसोल्ड राहिला.