अनुभवी खेळाडूला सामन्याचे रूप पालटवण्यासाठी फक्त एका क्षणाची गरज असते आणि हेच मुंबई सिटी एफसीच्या निकोलस अनेल्काने रविवारी दाखवून दिले. घरच्या मैदानातील तिसऱ्या सामन्यात ४४ मिनिटाला फ्री-किकच्या जोरावर अनेल्काने अप्रतिम गोल केल्यामुळे मुंबईला केरळा ब्लास्टर्सवर १-० असा विजय मिळवता आला. पाच सामन्यांमधील या दुसऱ्या विजयानंतर मुंबईने आठव्या स्थानावरून पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे, तर केरळाच्या संघाची सहाव्या स्थानावर घसरण झाली आहे.
मुंबईने खेळाला सुरुवात केल्यावर चेंडूवर चांगले नियंत्रण मिळवत केरळावर जोरदार आक्रमणे केली, पण केरळाचा संघ उत्तम बचाव करत मुंबईचे आक्रमण थोपवून लावत होता. सामन्याच्या १७व्या मिनिटाला अनेल्काकडे गोल करण्याची चांगली संधी चालून आली होती, पण यावेळी तो साफ अपयशी ठरला. त्यानंतर केरळाने मुंबईवर जोरदार आक्रमण करत  दोन मिनिटांमध्ये (२४व्या आणि २५व्या) तीन कॉर्नर मिळवले खरे, पण खेळाडूंच्या आततायीपणामुळे त्यांना गोल करण्याची संधी गमवावी लागली. अनेल्कासह मुंबईच्या संघाला जास्त काळ गोल गमावल्याचे शल्य वाटले नाही.
केरळाच्या इश्फाक अहमदने मुंबईच्या जॉन स्टोआन्झलला ढकलल्यामुळे मुंबईला ३० मी. अंतरावरून फ्री-किक मिळाली. अनेल्काने या संधीचे सोने करत संघाला मध्यंतरापूर्वीच यश मिळवून दिले.
सामन्याच्या दुसऱ्या सत्रामध्ये मुंबईने गोल करण्याच्या बऱ्याच संधी गमावल्या. दुसरीकडे केरळाने जोरदार आक्रमणे केली, मुंबईच्या अभेद्य बचावापुढे त्यांचे काहीच चालले नाही.