प्रशिक्षक अनिल कुंबळे यांचे स्पष्टीकरण

करुण नायरच्या त्रिशतकी खेळीनेही अजिंक्य रहाणेचे मागील दोन वर्षांचे सातत्य झाकोळले नाही. त्यामुळे मधल्या फळीतील अनुभवी फलंदाज रहाणेला अंतिम ११ खेळाडूंमधून वगळण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे स्पष्टीकरण भारताचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी दिले आहे.

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत रहाणेची फलंदाजी फारशी चांगली झाली नव्हती, याशिवाय हाताला दुखापत झाल्यामुळे त्याला काही सामन्यांना मुकावे लागले होते. पुण्यात झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत त्याने अनुक्रमे १३ आणि १८ धावा केल्या होत्या, जो सामना भारताने ३३३ धावांनी गमावला. रहाणेने मागील पाच कसोटी सामन्यांत फक्त २०४ धावा केल्या आहेत.

‘‘मागील दोन वष्रे कसोटी क्रिकेटमध्ये रहाणे हा भारताचा प्रमुख फलंदाज सिद्ध झाला आहे. त्यामुळे त्याला वगळणे कठीण आहे. दुसऱ्या कसोटीच्या संघरचनेविषयी आम्ही अद्याप चर्चा केलेली नाही, मात्र सर्व १६ खेळाडू उपलब्ध आहेत,’’ असे कुंबळे यांनी सांगितले.

करुणविषयी कुंबळे म्हणाले, ‘‘त्रिशतक झळकावूनही करुणला कसोटी सामन्याला मुकावे लागणे, हे दुर्दैवी आहे. मात्र संघाच्या बांधणीत त्याला स्थान नाही. कारण पाच गोलंदाजांना संघात स्थान द्यायचे झाल्यास बदली खेळाडू म्हणूनच तो परतू शकतो.’’

भारतीय संघ दुसऱ्या कसोटीत पाच गोलंदाजांसह खेळणार का, या प्रश्नाला मात्र कुंबळे यांनी सावधपणे उत्तर दिले. ते म्हणाले, ‘‘आम्ही योग्य समतोल साधून संघबांधणी करणार आहोत. कसोटी सामना जिंकण्याच्या दृष्टीने ती आवश्यक आहे. त्यामुळे चार किंवा पाच गोलंदाज वापरावे, हा निर्णय त्यावरच अवलंबून असेल.’’

एम. चिन्नास्वामीच्या खेळपट्टीबाबत कुंबळे म्हणाले की, ‘‘या खेळपट्टीकडून निकाल अपेक्षित आहे. खरे तर मला या खेळपट्टीबाबत फारसे माहीत नाही. मात्र या मैदानावर खेळतच मी वाढलो आहे. ही खेळपट्टी फलंदाजीला अनुकूल अशी आहे.’’

खेळपट्टीबाबत आपले मनोगत व्यक्त करताना कुंबळे म्हणाले, ‘‘मी खेळायचो त्या दिवसांत मी खेळपट्टीकडे कधीच गांभीर्याने पाहिले नाही. बऱ्याच जणांनी खेळपट्टीच्या दृष्टिकोनातून माझ्या गोलंदाजीविषयी विपुल लेखन केले. मात्र गोलंदाज, कर्णधार किंवा प्रशिक्षक अशा कोणत्याही भूमिकेत असताना खेळपट्टीची चिंता केली नाही. हो, खेळपट्टीची पाहणी करून रणनीती मात्र नक्की आखली आहे.’’