यंदाच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेनंतर नंतर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळ संपणार आहे. अशा स्थितीत बीसीसीआय नवीन प्रशिक्षकाच्या शोधात व्यस्त आहे. माजी कर्णधार आणि प्रशिक्षक अनिल कुंबळे नवीन प्रशिक्षकाच्या शर्यतीत असल्याचे म्हटले जात होते, परंतु तो बोर्डाच्या बहुतेक सदस्यांना प्रभावित करू शकला नाही. अशा परिस्थितीत १४ नोव्हेंबरला संपणाऱ्या विश्वचषकानंतर संघाला पुन्हा एकदा परदेशी प्रशिक्षक मिळू शकतो.

आयएएनएस या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अनिल कुंबळे स्वतः प्रशिक्षणासाठी फारसा उत्सुक नाही. बोर्डाच्या एका सूत्राने सांगितले, ”अनिल कुंबळेला परत यायचे नाही आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली वगळता इतर कोणालाही कुंबळेमध्ये स्वारस्य नाही. बोर्ड आता परदेशी प्रशिक्षकाचा शोध घेत आहे. विराट कोहली आणि इतरांसारख्या संघाच्या जुन्या खेळाडूंबरोबर पुन्हा काम करावे लागेल, याची कुंबळेला कल्पना आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी नवीन काहीही नसेल. गांगुलीने त्याचे नाव सुचवले. पण बोर्डाच्या इतर अधिकाऱ्यांनी यावर असहमती दर्शवली होती.”

हेही वाचा – IPL 2021 : ८ ऑक्टोबरला घडणार इतिहास..! एकाच वेळेला खेळवले जाणार ‘हे’ दोन सामने

अनिल कुंबळे सध्या आयपीएल टीम पंजाब किंग्जचा प्रशिक्षक आहे. सूत्राने सांगितले, ”अनिल कुंबळेचा कोचिंग रेकॉर्ड आकर्षक राहिला नाही. आयपीएलमध्ये पंजाबसोबत काय चालले आहे ते तुम्ही पाहू शकता. व्हीव्हीएस लक्ष्मण यांनाही हे पद मिळणे अवघड वाटते.”

विदेशी प्रशिक्षक टीम इंडियासाठी ठरलेत ‘लकी’

अनिल कुंबळे यापूर्वी टीम इंडियाचे प्रशिक्षक होते. पण २०१७ मध्ये त्याने कर्णधार विराट कोहलीशी झालेल्या वादानंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला. २०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात झालेल्या पराभवानंतर हा वाद समोर आला. यानंतर रवी शास्त्री यांना आणखी एक संधी देण्यात आली. परदेशी प्रशिक्षक टीम इंडियासाठी भाग्यवान ठरले आहेत. संघाने ग्रेग चॅपेलच्या प्रशिक्षणाखाली टी-२० विश्वचषक विजेतेपद पटकावले. मग २०११ च्या एकदिवसीय विश्वचषकात टीम इंडिया चॅम्पियन झाली, तेव्हा गॅरी कर्स्टन प्रशिक्षक होते. २०१३ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वेळी, डंकन फ्लेचर संघाचे प्रशिक्षक होते.