Anjali Tendulkar Buys 391 Sq ft Apartment in Virar: सध्या तेंडुलकर कुटुंबीय चर्चेचा विषय ठरलं आहे. अर्जुन तेंडुलकरने साखरपुडा केल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. अर्जुनने उद्योजक रवी घई यांची नात सानिया चंडोक हिच्याशी साखरपुडा केल्याचं म्हटलं जात आहे. पण याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दरम्यान अंजली तेंडुलकर यांनी काही महिन्यांपूर्वी मुंबईलगत असलेल्या विरारमध्ये एक घर खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. विरार हे मुंबईतील मध्यमवर्गीयांसाठी परवडणाऱ्या घरासाठींचे हक्काचे स्थान आहे. अंजली तेंडुलकर यांनी आपल्या कर्मचाऱ्यासाठी हे घर विकत घेतल्याचे आता समोर आले आहे.
द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना अंजली तेंडूलकर यांनी घर खरेदी केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. नोंदणीच्या कागदपत्रांवरून मे महिन्यात घर खरेदी केल्याची माहिती मिळत आहे.
अंजली तेंडुलकरने खरेदी केलेल्या घराची किंमत किती?
कागदपत्रांनुसार, हे अपार्टमेंट विरारमधील पेनिन्सुला हाइट्स नावाच्या इमारतीत आहे. फ्लॅटचे क्षेत्रफळ ३९१ चौरस फूट एवढे आहे. कागदपत्रात म्हटलं आहे की, हा फ्लॅट तिसऱ्या मजल्यावर आहे. कागदपत्रानुसार, हा व्यवहार ३० मे २०२५ रोजी नोंदणीकृत झाला होता. ज्यामध्ये १.९२ लाख स्टॅम्प ड्युटी आणि ३० हजार नोंदणी शुल्क आहे.
Zapkey.com या वेबसाइटनुसार, अंजली तेंडुलकरने हे अपार्टमेंट ३२ लाख रुपयांना खरेदी केले आहे. हे अपार्टमेंट सचिनच्या पत्नीच्या नावावर नोंदणीकृत आहे. महिला खरेदीदार म्हणून, अंजली तेंडुलकरला स्टॅम्प ड्युटीवर १ टक्के सूट मिळाली आहे. महाराष्ट्रात महिलांच्या नावावर घरांच्या नोंदणीवर हा लाभ उपलब्ध आहे, जिथे शहर आणि जिल्ह्यानुसार मुद्रांक शुल्क दर ५ ते ७ टक्के दरम्यान आहेत.
स्थानिक दलालांच्या मते, विरारमधील निवासी मालमत्तेचा प्रति चौरस फूट दर स्थानानुसार ६,००० ते ९,००० प्रति चौरस फूट आणि त्याहून अधिक आहे. सचिन तेंडुलकरची पत्नी अंजली तेंडुलकर ही पेशाने डॉक्टर आहे. त्यांनी मुंबईतील ग्रँट मेडिकल कॉलेज आणि सर जेजे ग्रुप ऑफ हॉस्पिटल्समधून एमबीबीएसची डिग्री मिळवली होती.
अंजली तेंडुलकर यांना मुंबई विद्यापीठात बालरोगशास्त्रामध्ये सुवर्णपदक देण्यात आले आहे. सचिन तेंडुलकर आणि अंजली यांचे लग्न २५ मे १९९५ रोजी झाले. दोघांची पहिली भेट १९९० मध्ये झाली होती, जेव्हा सचिन फक्त १७ वर्षांचा होता.