नवी दिल्ली : भारताची अनुभवी तिरंदाज दीपिका कुमारी हिने सातत्याने येणाऱ्या अपयशानंतरही आपण निवृत्तीचा नव्हे, तर मानसिकता कणखर करण्याचा विचार करत आहोत, असे सांगितले. लॉस एंजलिस २०२८ ऑलिम्पिक स्पर्धेच्या वेळी दीपिका ३४ वर्षांची असेल. मात्र, ही आपली अखेरची स्पर्धा ठरणार हे नक्की नाही, असे दीपिकाने स्पष्ट केले. तसेच आपली कारकीर्द अखेरच्या टप्प्यात आहे, असे अजिबातच नसल्याचेही तिने ठणकावून सांगितले.
‘‘सध्या माझे प्रशिक्षण हे तांत्रिक सुधारणा आणि कणखर मानसिकतेभोवती फिरत आहे. या दोन्ही आघाड्यांवर सध्या मी काम करत आहे. तिरंदाजी लीग मला यात सुधारणा करण्यास मदतशीर ठरेल,’’ असेही दीपिकाने सांगितले.
‘‘घरच्या प्रेक्षकांसमोर खेळताना नेहमीच दडपण असते. मात्र, प्रत्यक्षात हे दडपण खेळाडूंना सर्वोत्तम कामगिरीसाठी प्रेरित करते. आपले तंत्र इतके खोलवर रुजलेले हवे की दबावाच्या क्षणी त्याबद्दल विचारही करावा लागू नये. त्यामुळे मी सरावावर खूप लक्ष देत आहे,’’ असे दीपिका म्हणाली.
नवी दिल्ली येथे सुरू झालेल्या तिरंदाजी लीगच्या उद्घाटनाला दीपिकाने आपल्या कारकीर्दीवर प्रकाशझोत टाकला. त्याच वेळी तिने लीगचे कौतुकही केले. ‘‘तिरंदाजीची लीग सुरू होणे हे खेळाच्या लोकप्रियतेची आणि विकासाची साक्ष आहे. आम्ही सर्व तिरंदाज खूप आनंदी आहोत आणि लीगमध्ये दमदार कामगिरीसाठी उत्सुक आहोत,’’ असे दीपिका म्हणाली. तसेच लीग पाहण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे तिने चाहत्यांना आवाहन केले.
कम्पाऊंड प्रकाराचा ऑलिम्पिकमध्ये समावेश होणे खूप चांगले आहे. या प्रकारात आपला संघ भक्कम आहे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर या प्रकारात सातत्याने पदकांची संख्या वाढत आहे. – दीपिका कुमारी, आघाडीची तिरंदाज.