भारताचा माजी क्रिकेटपटू आणि क्रिकेटचा देव या नावाने ओळखला जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनही आपलं पाऊल क्रिकेटच्या मैदानात ठामपणे ठेवत आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मुंबई टी-२० लीग स्पर्धेसाठी लिलाव पार पडला. या लिलावात अर्जुनवर किती लाखांची बोली लागते याकडे सर्वांचं लक्ष होतं. त्याला आपल्या संघात दाखल करुन घेण्यासाठी संघांमध्ये चुरसही रंगली होती. अखेरीस आकाश टायगर्स MWS संघाने ५ लाख रुपये मोजत अर्जुनला आपल्या संघात दाखल करुन घेतलं आहे.
अर्जुनकडे मुंबई १४, १६ आणि १९ वर्षांखालील संघाकडून खेळण्याचा अनुभव आहे. त्याशिवाय गतवर्षी त्यानं श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताच्या १९ वर्षांखालील संघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यात त्याने तीन विकेट्स घेतल्या होत्या आणि दोन डावांत त्याला केवळ १४ धावा करता आल्या होत्या. मात्र, डॉ. डी वाय पाटील टी-२० चषक स्पर्धेत त्याने उल्लेखनीय कामगिरी केली. याच कामगिरीमुळे त्याला मुंबईच्या २३ वर्षांखालील संघात स्थान मिळाले होते.