भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग हा सध्या त्याच्या सोशल मीडियावरील व्हीडिओमुळे चांगलाच चर्चेत आहे. याशिवाय आशिया चषकातील त्याच्या श्रीलंकेविरूद्धच्या गोलंदाजीमुळे आणि हारिस रौफला प्लेन क्रॅशच्या हातवाऱ्यांना दिलेल्या प्रत्युत्तराचे व्हीडिओ व्हायरल होत आहेत. अर्शदीप आशिया चषकात भले सर्व सामने खेळला नसेल पण सामन्यानंतरच्या प्रत्येक व्हीडिओमुळे तो सातत्याने चर्चेत राहिला आहे. यादरम्यान त्याचा अजून एक मैदानावरील व्हीडिओ व्हायरल होत आहे.
भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ संघादरम्यानच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात अर्शदीपने आपल्या विनोदांनी आणि कृतीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. डावखुरा वेगवान गोलंदाजाने ऑस्ट्रेलियन डावादरम्यान सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करताना पुश-अप आणि काही डान्स मुव्हज करत प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसला. ज्याचा व्हीडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
अर्शदीप सिंग सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत असताना चाहते त्याला आवाज देत त्याला चिअर करत आवाज देत होते. दरम्यान अर्शदीपही चाहत्यांबरोबर मजा-मस्ती करताना दिसला. दरम्यान तो अचानक मैदानावर पुश अप करताना आणि बसून काही स्टेप्स करताना दिसला.
अर्शदीप अलीकडेच दुबईत झालेल्या आशिया चषक २०२५ मध्येही खेळला होता, जिथे भारताने पाकिस्तानवर रोमांचक अंतिम विजय मिळवून जेतेपद पटकावलं. त्याने स्पर्धेत दोन सामने खेळले, गट टप्प्यात ओमानविरुद्ध आणि सुपर ४ मध्ये श्रीलंकेविरुद्ध, दोन्ही सामन्यांमध्ये मिळून तीन विकेट्स घेतल्या.
ऑस्ट्रेलिया अ विरूद्ध झालेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात भारताने प्रतिस्पर्धी संघाचा २ विकेट्सने पराभूत केलं. या विजयासह भारत अ संघाने तीन सामन्यांची मालिका २-१ च्या फरकाने जिंकली. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलिया अ संघाने ४९.१ षटकांत ३१७ धावा केल्या. कर्णधार जॅक एडवर्ड्सने ७४ चेंडूत ८९ धावा केल्या, तर लियाम स्कॉटने ६४ चेंडूत ७३ आणि कूपर कॉनोलीने ४९ चेंडूत ६४ धावा केल्या.
प्रत्युत्तरात, भारत अ संघाने ४६ षटकांत ८ गडी गमावून लक्ष्य गाठलं. सलामीवीर प्रभसिमरन सिंगने आक्रमक फलंदाजी करत ६८ चेंडूत ८ चौकार आणि ७ षटकारांसह शतक झळकावत १०२ धावा केल्या. कर्णधार श्रेयस अय्यरने ५८ चेंडूत ६२ धावा केल्या, तर रियान परागने ५५ चेंडूत ६२ धावा केल्या. ऑस्ट्रेलिया अ संघाचे गोलंदाज टॉड मर्फी आणि तनवीर संघाने गोलंदाजीत शानदार कामगिरी केली आणि प्रत्येकी चार बळी घेतले, पण भारताच्या फलंदाजांनी बाजी मारली.