पुरुष आणि स्त्री- निसर्गाचीच दोन रुपं. दोन्ही आविष्कारांची काही गुणवैशिष्टय़ं तर काही उणीवा. गुणसूत्रांच्या रचनेत एक्स आणि वाय या दोन संकल्पनामध्ये विभागणी होणारे हे दोन घटक. निसर्गाने रचना करताना मूलभूत फरक ठेवला आहे मात्र भेद केलेला नाही. माणसाने मात्र आर्थिक, सामाजिक स्तरावर वावरताना पुरुष अव्वल आणि स्त्री दुय्यम असे वर्गीकरण सुरू केले. चूल आणि मूलपुरत्या मर्यादित करण्यात आलेल्या एकांगी, वर्चस्ववादी आणि कौशल्याला संकुचितता देणाऱ्या रचनेला बाजूला सारत भरारी घेण्यासाठी खुप काळ जावा लागला. शिक्षणापासून नोकरी किंवा व्यवसाय करण्यापर्यंत आणि लग्नाच्या निर्णयापासून घराबाहेर वावरण्यापर्यंत सगळ्यावरचा पुरुषी अंमल दूर होईपर्यंत अनेक पिढय़ांनी सोसलं. सामाजिक सुधारणा, प्रवाहाविरुद्ध दृष्टिकोन स्वीकारणारे द्रष्टे धुरीण आणि एकूणच जागतिकीकरणानंतर झालेल्या टेक्नोसॅव्ही जगात स्त्रियांना स्वातंत्र्य मिळाले. पण समानतेचे काय? जेथे खिलाडूपणा हाच महत्त्वाचा त्या खेळाच्या मैदानावर तरी स्त्रीला समानतेची वागणूक मिळते का?
खेळ हा कोणत्याही नागरीकरण व्यवस्थेचा अविभाज्य घटक असतो. खेळाच्या निमित्ताने देशाप्रती यश मिळवण्याची संधी असते. त्यामध्ये पुरुष आणि महिला खेळाडू असा भेद नसतो. आंतरराष्ट्रीय स्तरावर देशासाठी पदक अथवा जेतेपद मिळवणारा तो किंवा ती दोघेही देशवासियांना अभिमानास्पद असतात. मात्र जिंकल्यानंतर बक्षीस रकमेमधला भेदभाव बुरसटलेल्या विचारसरणीची आठवण करून देणारा असतो. पण हा भेद पुरुष-स्त्री या जीवशास्त्रीय श्रेष्ठपणापेक्षा खेळाचा दर्जा आणि जेतेपदापर्यंतच्या खडतर वाटचालीचा आहे.
प्रदीर्घ परंपरा असलेल्या या विचारघुसळणीला नव्याने वाचा फोडली स्क्वॉशपटू दीपिका पल्लीकलने. पुरुष आणि महिलांना समान बक्षीस रक्कम नाही या कारणास्तव दीपिकाने राष्ट्रीय स्पर्धेतून माघार घेतली. जागतिक क्रमवारीत अव्वल दहामध्ये स्थान पटकावणारी दीपिका पहिली भारतीय स्क्वॉशपटू आहे. अर्जुन आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित दीपिकाने गेल्यावर्षी राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला स्क्वॉशमध्ये सुवर्णपदक मिळवून दिले होते. जेतेपदे आणि यशाच्या निकषावर समकालीन पुरुष खेळाडूंच्या तुलनेत दीपिकाची कामगिरी दमदार आहे. राष्ट्रीय स्पर्धेतला तिचा सहभाग स्पर्धेसाठी, युवा खेळाडूंसाठी आणि खेळाच्या प्रसार-प्रचाराच्या दृष्टीने उपयुक्त ठरला असता. कारण पुरुष विजेता आणि महिला विजेतीच्या बक्षीस रकमेत ४० टक्यांचा फरक आहे. राष्ट्रीय जेतेपदाचे मोल पैशात करू नये ही भावनिक भूमिका तर पुरुष खेळाडूइतकेच कष्ट करून मिळवलेल्या यशाच्या गौरवात विषमता का हा व्यवहार्य दृष्टिकोन या दोन आघाडय़ांवर हा वाद आहे.
बक्षीस रकमेत फरक असण्याचे प्रमुख कारण दिले जाते ते म्हणजे दोन्ही गटांमध्ये असणारी सहभागाची तफावत. पुरुषांच्या गटात स्पर्धकांची संख्या प्रचंड असते. पात्रता फेरी ओलांडून मुख्य स्पर्धेसाठी पात्र होणे हेच खडतर असते. त्यामुळे पुरुष खेळाडूंचा जेतेपदापर्यंतचा प्रवास जिकिराचा असतो. यातुलनेत महिला गटात स्पर्धकांची संख्या कमी असते, सामने झटपट संपतात. कमी मेहनतीत आणि वेळेत जेतेपदाची वाट सुकर होते. त्यामुळे ज्याची मेहनत जास्त त्याचा मेहनताना जास्त हे तत्व लागू होते. यामध्ये पुरुष आणि स्त्री यापेक्षाही स्पर्धात्मक गुणवत्तेतला फरक महत्त्वाचा ठरतो. राष्ट्रीय स्पर्धाचे नियम पारंपरिक आहेत. त्यामुळे या स्पर्धामध्ये बक्षीस रकमेत फरक आढळतो. मात्र मानांकन स्पर्धामध्ये जिथे पुरुष आणि महिला गटात स्पर्धकांची संख्या समान असते तिथे बक्षीस रकमेत समानता पाळली जाते.
सर्वाधिक जनाधार लाभलेला देशातला खेळ म्हणजे क्रिकेट. प्रदीर्घ पाठपुराव्यानंतर बीसीसीआयने आता कुठे महिला क्रिकेट संघटनेला आपल्या छत्रछायेखाली घेतले आहे. धोनी, कोहलीला एका सामन्यासाठी २-३ लाख रुपये मिळत असताना महिला क्रिकेटपटूंची प्रति सामना ३००० रुपयांवर बोळवण करण्यात येत होती. बीसीसीआयने महिला क्रिकेटपटूंसाठीही वार्षिक कराराची घोषणा केली आहे मात्र तरीही पुरुषांच्या तुलनेत कमाईत प्रचंड तफावत आहेच. पुरुषांच्या एकदिवसीय विश्वचषक विजेत्या संघाला २, ५००, ००० युरो रकमेने गौरवण्यात आले. महिला विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलिया संघाला देण्यात आले ४७,००० युरो.
हॉकीला राष्ट्रीय खेळाची बिरुदावली मिळाली आहे. अंतर्गत बंडाळ्यांनी ग्रस्त हॉकीमध्येही पुरुष आणि महिला विजेत्यांच्या मिळकतीत मोठा फरक आहे. ‘चक दे इंडिया’ म्हणत देशासाठी जीव ओतणाऱ्या रणरागिणींना समान वेतन हक्क कधी मिळणार? महिलांच्या सामन्यांना प्रेक्षक नाहीत, त्यामुळे प्रायोजक मिळण्यात अडचणी अशी कारणं पुढे केली जातात. पण महिलांच्या सामन्यांची लोकप्रियता वाढावी यासाठी प्रयत्न होताना दिसत नाहीत. शतकीय वारसा लाभलेल्या ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धामध्येही बक्षीस रकमेत जाणवण्याइतका फरक होता. महिला खेळाडूंनी उभारलेल्या लढय़ानंतर आता चारही ग्रँड स्लॅम स्पर्धामध्ये महिला खेळाडूंना समान बक्षीस राशी मिळते. मात्र महिलांचे एकतर्फी, नीरस आणि झटपट आटोपणारे सामने आणि पुरुषांच्या गटात पाच तास परीक्षा पाहणारे द्वंद्व या दोघांना एकाच धनराशीने तोलणं सद्सदविवेक बुद्धीला पटत नाही.
जगभर खेळल्या जाणाऱ्या फुटबॉलमध्ये आढळणारी असमानता अचंबित करणारी आहे. गेल्यावर्षी विश्वचषक पटकावणाऱ्या जर्मनीच्या संघाला २२ दशलक्ष युरो रकमेने गौरवण्यात आले तर काही महिन्यांपूर्वी महिलांचा विश्वचषक विजेत्या अमेरिकेला ६३०, ००० युरो एवढीच रक्कम देण्यात आली. गंमत म्हणजे जगभर पुरुषांच्या विविध स्पर्धाची प्रेक्षणीयता वाढावी यासाठी आकर्षक वस्त्रातील निवेदिका आणि चीअरलीडर्सची नियुक्ती होते. पण महिलांच्या स्पर्धाना प्रेक्षक नाहीत यापेक्षा विरोधाभास तो काय?
मुळातच या सगळ्याकडे स्त्री-पुरुष समानता या चष्म्यातून पाहणे योग्य नाही. कॉर्पोरेट कंपनीचे प्रमुखपद ते देशाची चॅन्सलर तसेच विमान सारथ्यपटू सर्व क्षेत्रांमध्ये महिलांनी भरारी घेतली आहे. खेळांच्या दुनियेत त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. पण समानतेची पट्टी खेळात लागू होणार नाही. महिला स्पर्धकांची संख्या आणि खेळाचा दर्जा जसजसा वाढू लागेल तेव्हा आपोआपच सर्व प्रकारच्या स्पर्धाच्या बक्षीस रकमेत एकवाक्यता येईल. आताही अनेक खेळांमध्ये आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय स्तरावर बक्षीसात समानता आहे. मात्र सगळीकडे ही परिस्थिती येण्यासाठी थोडा वेळ देणं आवश्यक आहे.
पराग फाटक -parag.phatak@expressindia.com
संग्रहित लेख, दिनांक 9th Aug 2015 रोजी प्रकाशित
असमानतेची अखिलाडूवृत्ती
पुरुष आणि स्त्री- निसर्गाचीच दोन रुपं. दोन्ही आविष्कारांची काही गुणवैशिष्टय़ं तर काही उणीवा. गुणसूत्रांच्या रचनेत एक्स आणि वाय या दोन संकल्पनामध्ये विभागणी होणारे हे दोन घटक.

First published on: 09-08-2015 at 04:17 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article about sportswomen