‘वयचोरीचा मामला’ हा केवळ क्रिकेटमध्येच असतो असे नाही; जितके खेळ जुने, तितकीच वयचोरी. फुटबॉलसारख्या खेळाला या कलंकित इतिहासाची काळी किनार खूप जुनी आहे, तितकीच मनोरंजक आहे. ‘फिफा’ने त्याबाबत कडक पावले उचलूनदेखील हे प्रकार घडतात.
दिवाळीच्या आगमनासोबत मुंबईच्या मदानांवर लगबग सुरू होते ती शालेय आणि महाविद्यालयीन क्रिकेटची. क्रिकेटच्या पंढरीत आपल्या मुलामध्ये सचिन (अलीकडे एबीडी) आणि विद्यार्थ्यांमध्ये किमान रोहित शोधणारे प्रशिक्षक यांची भाऊगर्दी सगळीच मदाने व्यापून टाकतात. आयपीएलचे सोनेरी स्वप्न आज ताजे असताना मुंबईत होऊ घातलेली मुंबई क्रिकेट असोसिएशनची (एमसीए) मुंबई प्रीमियर लीग अशी किती तरी भविष्यकालीन स्वप्ने, अनेकांच्या उमेदीला धुमारे फोडण्यास पुरेशी ठरतात.
जसजसा क्रिकेटचा हा शालेय स्तरावरचा ज्वर चढू लागतो, तसतशी प्रत्येक मदानाच्या पॅव्हेलियनमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू होते ती एका वेगळ्या विषयाची. ती म्हणजे ‘खेळाडूंची वयचोरी.’ १२, १४, १६, १७, १९, २२ अशा प्रमुख वयोगटांमध्ये शालेय-महविद्यालयीन स्पध्रेचे जाळे विखुरलेले आहे. पण वय जास्त असलेले खेळाडू छोटय़ा वयोगटांत खेळवण्याचे प्रकार हे भुवया उंचावतात.
‘वयचोरीचा मामला’ हा केवळ क्रिकेटमध्येच असतो असे नाही; जितके खेळ जुने, तितकीच वयचोरी. फुटबॉलसारख्या खेळाला या कलंकित इतिहासाची काळी किनार खूप जुनी आहे, तितकीच मनोरंजक आहे. ‘फिफा’ने त्याबाबत कडक पावले उचलूनदेखील त्याचे प्रत्यय अधेमध्ये येत असतात. मुंबईतदेखील वांद्रे येथील एका ‘बडय़ा’ शाळेला निलंबित केले गेल्यानंतरच ‘वयचोरी’ अगदी ठळकपणे उजेडात आलेली गेल्या वर्षी पाहायला मिळाली. कबड्डीमध्येदेखील आधारकार्डाचा गरवापर करून खोटी जन्मतारीख वापरणारे महाभाग पाहायला मिळाले. तसाच काहीसा प्रकार बॅडमिंटनमध्येही. सगळ्याच वय आधारित मदानी आणि इनडोअर खेळांमध्ये ही वयचोरी दिसून येते, पण क्रिकेटमध्ये मात्र ती जास्त जाणवते. कारण या क्रिकेटवेडय़ा देशात त्याची शारीरिक आणि मानसिक झळ बसणाऱ्यांची संख्यादेखील तेवढीच लक्षणीय आहे.
मुंबईच्या क्रिकेटचा शालेय क्रिकेट हा पाया आहे. विविध क्लब, रणजी ते आंतरराष्ट्रीय खेळाडू आदी सगळ्यांचा स्रोत शालेय क्रिकेट आहे. काल-परवापर्यंत दक्षिण मुंबई आणि दादरमध्येच व्यापलेले शालेय क्रिकेट आता भिवंडी, ठाणे, बदलापूर, पालघर, डहाणू, अंबरनाथ या परिसरात ‘प्रसवले’ आणि पसरले आहे, तरीही दर वर्षी त्याच त्याच शाळा स्वत:चे प्रभुत्व कायम ठेवत असल्याचे चित्र नेहमीच दिसते. दर्जेदार प्रशिक्षणाची जोड होतीच, पण त्यात काही ‘गोलमाल’ असल्याचेही अनेकांना वाटून जायचे. अमोल मुझुमदारसारख्या खेळाडूंनी याविरोधात अनेकदा आपला आवाज बुलंद केला होता. कारण या वयचोरी प्रकरणामुळे अनेक प्रज्ञावंत खेळाडू कधीच प्रकाशात आले नाहीत किंवा येऊ दिले गेले नाहीत, हा इतिहास आहे.
निकोप स्पर्धा हे ध्येय गाठण्यासाठी आणि खऱ्याखुऱ्या गुणवंत खेळाडूंना शोधण्यासाठी स्पर्धादेखील तेवढीच प्रामाणिक असण्याची गरज आहे. योग्य वयात योग्य संधीसाठी र्सवकष प्रयत्नांची गरज आहे. वयचोरीबाबत कडक नियमावली करणारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील पहिली क्रीडा संघटना आहे, हे महत्त्वाचे आहे. कीर्ती आझाद यांच्या पुढाकारामुळे २२ उदयोन्मुख खेळाडूंवर बंदी घालण्याचे काम बीसीसीआयने केले. पण या कारवाईने वयचोरी थांबली का? अथवा थांबेल का? तर त्याचे उत्तर ‘नाही’. कारण ‘वयचोरी’ची ही उदाहरणे म्हणजे हिमनगाचा एक भाग आहे. ‘जो पकडला जातो, तो चोर आणि..’ असे याचे स्वरूप. म्हणूनच अत्यंत प्रभावशाली अशा एमसीएसारख्या संघटनांनी पुढाकार घेऊन वयचोरीबाबत अतिशय कठोर नियमावली तयार करायला हवी. त्यात कमाल शिक्षा खेळाडूला न करता शाळा, त्यांचे संघ संचालक, प्रशिक्षक यांना करायला हवी. कारण वयचोरीला उत्तेजन हे मुख्यत्वे प्रशिक्षकांकडून दिले जाते. दोन-तीन वर्षांच्या निलंबनाऐवजी शाळा, प्रशिक्षकांना पाच-सहा वष्रे क्रिकेटच्या परिघापासून दूर ठेवण्याची शिक्षा असायला हवी. मुंबई क्रिकेट असोसिएशनने गेल्या दोन वर्षांपासून वयोगटातील खेळाडूंच्या वयाचा लेखाजोखा नोंदणी करण्याची प्रक्रिया मोफत आणि अनिवार्य केली आहे. याचप्रमाणे राष्ट्रीय स्पध्रेत वयोगटांत खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूची हाडाची चाचणी करून घेतली जाते, परंतु ही माहिती पारदर्शक म्हणजेच सर्वासाठी उपलब्ध असावी. याचप्रमाणे प्रत्येक खेळात जन्मतारखेचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, पासपोर्ट, आधारकार्ड यासोबत हाडाच्या चाचणीचा अहवालसुद्धा खेळाडूंनी स्वत:कडे ठेवणे क्रमप्राप्त करावे; जेणेकरून वयचोरीसारख्या प्रकाराला आळा बसू शकेल.
वयचोरी कशी होते?
वयचोरीचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे जन्मतारखेचा दाखला. या प्रमाणपत्रात फेरफार करण्याचा मार्ग क्रीडा क्षेत्रात सर्रास वापरला जातो. त्यामुळे काही खेळांतील काही खेळाडूंकडे वेगवेगळ्या जन्मतारखांचे दाखले असतात. कबड्डीमध्ये अशाच प्रकारे बनावट आधारकार्डे काही खेळाडूंकडे आढळली होती. त्यामुळे एखाद्या खेळाडूचे वय ठरवताना फक्त जन्मतारखेच्या दाखल्याच्या पुराव्यावर अवलंबून राहणे योग्य ठरणार नाही.
हाडांची तपासणी अनिवार्य असावी
क्ष-किरण चाचणीद्वारे हाडांची तपासणी (बोन टेस्ट) ही पारंपरिक चाचणी उपलब्ध आहे. पण एमआरआय स्कॅिनगची ‘टॅनर व्हाइट हाऊस टेस्ट-३’ (टीडब्ल्यू-३) ही सर्वात महत्त्वाची चाचणी आहे. जन्माला आल्यापासून १७-१९ या वयोगटांपर्यंत हाडाच्या वाढीचा टप्पा वैद्यकीयदृष्टय़ा नियमित असतो. टीडब्ल्यू-३न्वये खेळाडूंच्या विशिष्ट हाडांच्या वाढीनुसार त्यांचे वय ठरवता येणे शक्य आहे. यासाठी मनगट, कोपर या हातांच्या हाडांच्या वाढीचे प्रमाण मोजले जाते. याच्या अचूकतेचे प्रमाण जवळजवळ ९६ टक्के इतके आहे. नेमका हाच या चाचणीचा आधार आहे. त्यामुळे ही वैद्यकीय चाचणी क्रीडा क्षेत्रात अनिवार्य करावी. किंबहुना स्वत: काही संघटनांनी या चाचणीबाबत खेळाडू, प्रशिक्षकांमध्ये जागृती आणावी. अनेक इस्पितळांच्या मदतीने ही हाडांच्या तपासणीची प्रक्रिया क्रीडा संघटनांना राबवता येऊ शकेल. शेरावत, आर्यन शेरावत विरुद्ध बीसीसीआय खटल्यामध्ये उच्च न्यायालयाने भारतीय क्रिकेट मंडळाच्या बाजूने निर्णय दिला होता.