आक्रमकपणा ऑस्ट्रेलियाच्या रक्तातच, त्यामुळे त्याने फलंदाजांवर चाल करून जाताना मागेपुढे कधीही पाहिले नाही. म्हणूनच मिचेल जॉन्सनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून घेतलेली निवृत्ती फलंदाजांना सुखावून गेली.
खेळपट्टी पाटा, सीमारेषेची लांबी कमी, फलंदाजधार्जिणे नियम, हा खेळ फक्त फलंदाजांचाच, असे ठाशीवपणे क्रिकेट चाहत्यांवर बिंबवले गेले होते; पण तरीही त्याची दहशत वाटायची. तो म्हणजे एक वादळच, फलंदाजांभोवती घोंघावणारे, त्यांना धडकी भरवणारे, नतमस्तक करायला लावणारे. तो जेव्हा हातात चेंडू घेऊन लयीत धावत यायचा, तेव्हा त्याचा रुबाब भल्याभल्यांचा अहंकार ठेचणारा होता. धावत यष्टीजवळ आल्यावर तर तो फलंदाजांसाठी कर्दनकाळच वाटायचा. डोळ्याला डोळे भिडवायची धमक त्याच्यात होतीच. आक्रमकपणा ऑस्ट्रेलियाच्या रक्तातच, त्यामुळे त्याने फलंदाजांवर चाल करून जाताना मागेपुढे कधीही पाहिले नाही. म्हणूनच त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून घेतलेली निवृत्ती फलंदाजांना सुखावून गेली. मिचेल जॉन्सन निवृत्त झाल्याचे कळताच फलंदाजांनी सुटकेचा नि:श्वास नक्कीच सोडला असेल.
असे गोलंदाज पिढीत एकदाच जन्माला येतात. २००७ साली जॉन्सनने क्रिकेट विश्वात पदार्पण केले. दोन वर्षांमध्ये त्याने चांगले नाव कमावले. तुम्ही भारताला पराभूत करा किंवा दक्षिण आफ्रिकेला किंवा कोणत्याही अन्य संघाला, पण जोपर्यंत तुमची अॅशेस मालिकेत चांगली कामगिरी होत नाही, तोपर्यंत तुम्हाला महान समजले जात नाही. २००९ साली अॅशेस मालिकेत जॉन्सन ऑस्ट्रेलियाच्या वेगवान माऱ्याचे नेतृत्व करत होता. या मालिकेत त्याला महान दर्जा मिळेल, असे साऱ्यांनाच वाटत होते; पण त्याच वेळी त्याच्या आईने प्रेयसीवर सार्वजनिकरीत्या हल्ला चढवला. जॉन्सनची प्रेयसी जेसिका ब्रॅटीच कराटेमध्ये अग्रस्थानी होती, पण तिची मिळकत काही जास्त नव्हती. प्रेमात जात-पात, धर्म, पैसा यांना स्थान नसते; पण त्याच्या आईने जेसिकाचे जॉन्सनवर प्रेम नसून फक्त त्याच्या पैशांवर प्रेम आहे, असा आरोप केला आणि जॉन्सन निराशेच्या गर्तेत अडकला. त्यामधून त्याला बाहेर पडताच आले नाही. कार्डिफ असो किंवा लॉर्ड्स गोलंदाजीसाठी पोषक वातावरणात जॉन्सन निष्प्रभ ठरला आणि संघातून बाहेर फेकला गेला. पण तो संपला नाही.
मानसिक अस्थिरता, दुखापतींचा ससेमिरा दूर सारत त्याने पुन्हा संघात आगमन केले. ऑस्ट्रेलियाने कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या दक्षिण आफ्रिकेला धूळ चारली ती जॉन्सनच्या जोरावरच. दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांसाठी तर तो कर्दनकाळच होता. हा कधी कोणाचा बळी मिळवेल, हे सांगता येणे कठीण होते. ग्रॅमी स्मिथचा हात जवळपास त्याने मोडला होता. पर्थवरचा २००८ सालचा सामना. दक्षिण आफ्रिकेचा संघ ३ बाद २३४ अशा सुस्थितीत होता, पण जॉन्सनला लय सापडली होती. त्यानंतर फक्त २० चेंडूंमध्ये त्याने पाच फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला आणि ८ बाद २४१ अशी त्यांची अवस्था केली. हेच जॉन्सनचे वैशिष्टय़ होते. तो लयीत आला, की प्रतिस्पर्धी संघ भुईसपाट झाला म्हणूनच समजा.
अॅशेसमधल्या वाईट कामगिरीचे शल्य त्याला बोचत होते, पण हार जॉन्सनने हार मानली नाही. २०१३-१४ सालची अॅशेस ही जॉन्सनच्या नावावर लिहावी लागेल, कारण या मालिकेत त्याच्या गोलंदाजीला तोड नव्हती. त्याने सारी कसर भरून काढली. वॉर्नर, क्लार्क, स्मिथ, सिडल, लिऑन चांगल्या फॉर्मात होते, पण जॉन्सनची सर मात्र त्यांना नव्हती. इंग्लंडने त्याचा धसकाच घेतला होता. पाच सामन्यांमध्ये त्याने जवळपास १४ च्या सरासरीने ३७ बळी मिळवले होते. गेल्या २५ वर्षांमध्ये अॅशेस मालिकेत सर्वाधिक बळी मिळवणारा तो एकमेव वेगवान गोलंदाज ठरला. ग्लेन मॅग्रा (३६), क्रेग मॅकडरमॉट (३२) यांनाही त्याने मागे टाकले होते. त्याच्या या सुपरफास्ट एक्स्प्रेसमुळे अलवारपणे ऑस्ट्रेलियाच्या हातामध्ये अॅशेस चषक विसावला. २०१४ आणि २००८ या दोन्ही साली त्याला आयसीसीचा पुरस्कारही मिळाला.
१७व्या वर्षी क्वीन्सलँडमध्ये सर्वाधिक वेग जॉन्सनचा होता. त्यानंतर सेनादलात जाण्याचा विचार करत असतानाच त्याला डेनिस लिली यांनी हेरले आणि तो क्रिकेटमध्ये आला. त्यांच्यामुळेच एक दर्जेदार वेगवान गोलंदाज क्रिकेटविश्वाला पाहायला मिळाला. नैसर्गिक वेग, स्विंगसाठी पोषक शैली आणि फलंदाजांची मानसिकता अस्खलितपणे ओळखणारा कट्टर वेगवान गोलंदाजाचा अलविदा चटका लावून जाणाराच. दुसरीकडे मोठय़ा सामन्यांमध्ये हमखास भेदक मारा करणारा वेगवान गोलंदाज ऑस्ट्रेलियाने गमावला, हे मात्र निश्चित.
प्रसाद लाड
prasad.lad@expressindia.com