समाजात आपल्याला ज्या खेळाद्वारे प्रतिष्ठा व मानसन्मान मिळवून दिले आहेत, त्या खेळाचे ऋण फेडण्यासाठी आपण नियमित काही तरी केले पाहिजे, या भावनेतूनच खो-खो खेळावर जिवापाड प्रेम करणाऱ्या माणसांची संस्था म्हणजे पुण्याचा नवमहाराष्ट्र संघ असे म्हटले जाते. १९६० पासून या खेळामध्ये नवमहाराष्ट्र संघाने आपले स्वतंत्र स्थान उमटवले आहे.

गुरुवर्य  शंकरराव पाटणकर हे नूतन मराठी विद्यालयात भूगोल विषयाचे शिक्षक होते. मात्र त्यांचे खो-खो खेळावर जिवापाड प्रेम होते. त्यांनी १९५५ मध्ये सातवी-आठवीतील काही विद्यार्थ्यांना हा खेळ शिकवण्यास प्रारंभ केला. या खेळाडूंना संघटित स्वरूपात ठेवले पाहिजे, या हेतूने त्यांनी नवमहाराष्ट्र संघाची स्थापना केली. सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या मैदानावर हा संघ स्थापन करण्यासाठी पाटणकर यांना सुरेश श्रोत्री, सुरेश दिनकर, शरद साठय़े, वसंत साठय़े, नरहरी जोग, घनश्याम भिडे, प्रभाकर धूपकर, शशिकांत ओक, अरुण करमरकर, प्रकाश खरात, अनंत सोहोनी, शांताराम खांबे, चंद्रकांत कवठेकर यांचे बहुमोल सहकार्य लाभले. सुरुवातीच्या काळात या संघाला स्थानिक स्तरावर अनेक तुल्यबळ संघांच्या आव्हानाला सामोरे जावे लागले. आता स्थानिक स्तराप्रमाणेच राष्ट्रीय स्तरावरील अग्रगण्य संघ म्हणून त्याचा नावलौकिक झाला आहे. गेल्या ५७ वर्षांमध्ये या संघाने शेकडो राष्ट्रीय खेळाडू महाराष्ट्राला दिले आहेत.

नवमहाराष्ट्र संघातर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या अखिल भारतीय स्तरावरील स्पर्धामध्ये प्रत्येक वेळी काही नावीन्य देण्याचा प्रयत्न झाला आहे. एलईडीचे मोठे स्क्रीन, इलेक्ट्रॉनिक गुणफलक, वेबसाइट व यू टय़ूबवर थेट प्रक्षेपण व समालोचन, राष्ट्रीय वाहिनींवर थेट प्रक्षेपण आदी अनेक सुविधा या स्पर्धेसाठी उपलब्ध केल्या जात असतात. नवमहाराष्ट्र संघाच्या अनेक स्पर्धाच्या वेळी पावसाचा व्यत्यय निर्माण होत असतो. मात्र त्यामुळे सामने थांबू नयेत म्हणून दोन्ही मैदानांवर पूर्णपणे आच्छादने घालण्याबाबत या संघाने स्पर्धेचा रसभंग केलेला नाही. १९७१ पासून अखिल भारतीय स्तरावर सामने आयोजित करीत या खेळाची लोकप्रियता वाढविण्यासाठी या संघाने प्रयत्न केला आहे. त्यांच्या या प्रयत्नांना शिक्षण प्रसारक मंडळीचे नेहमीच सहकार्य लाभले आहे. श्रीरंग इनामदार, सुरेश दिनकर, अरविंद पटवर्धन, दिनेश धडफळे व त्याची सर्व भावंडे, सुहास वाघ, अरुण बोडस, महेश मेढेकर, अतुल जोशी आदी अनेक जणांच्या कुटुंबातील सर्व जण या स्पर्धाच्या वेळी सतत कार्यरत असतात. एरवीदेखील नवोदित खेळाडूंना मार्गदर्शन करणे, त्यांना अभ्यासाबाबत मार्गदर्शन करणे, नोकरी मिळवून देणे आदीबाबतही संघाचे ज्येष्ठ खेळाडू व संघटक पुढाकार घेत असतात. मैदानावर आजही पन्नासहून अधिक खेळाडू नियमित सराव करीत असतात. अनेक शाळांमध्येही या संघाचे प्रशिक्षक या खेळाचे प्रशिक्षण देत असतात. काही वर्षांपूर्वी नेपाळमध्ये तेथील राज्यकर्त्यांच्या निमंत्रणावरून नवमहाराष्ट्र संघाने पुरुष व महिला खेळाडूंचे संघ पाठवत प्रदर्शनीय सामने घेतले होते. त्यामुळेच आशियाई अजिंक्यपद स्पर्धेला चालना मिळाली होती. आजही परदेशातील क्रीडा चाहत्यांना या खेळाविषयी आकर्षित करण्यासाठी या संघाकडून प्रयत्न केले जात असतात. वाढते क्लासेस, नोकरी मिळवण्यासाठी आवश्यक असणारी पदवी यामध्ये सर्वच खेळांमधील खेळाडू गुरफटलेले असतात, तरीही खो-खो खेळाची लोकप्रियता टिकवण्यासाठी नवमहाराष्ट्र संघ प्रयत्नशील आहे.

अद्ययावत वेबसाइट

नवमहाराष्ट्र संघात खो-खो खेळणारे अनेक जण माहिती तंत्रज्ञान अभियंता असल्यामुळे या खेळाडूंनीच संघाची वेबसाइट विकसित केली आहे. संघाचे संस्थापक, विविध पुरस्कार विजेते, संघाने मिळवलेली विविध विजेतेपदे याबरोबरच खो-खो खेळाचा इतिहास, त्यामधील तांत्रिक बाबी, नियमावली याचीही माहिती त्यावर देण्यात आली आहे. साधारणपणे दर आठवडय़ाच्या अखेरीस ही माहिती अद्ययावत केली जात असते. संघाचे माजी खेळाडू, प्रशिक्षक व संघटक असलेले डॉ. वसंत साठय़े यांनी खो-खो खेळाचे नियम व तंत्राविषयी मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषेत पुस्तके लिहिली आहेत. ही दोन्ही पुस्तके या वेबसाइटवर उपलब्ध आहेत.

पुरस्कार विजेत्यांची मांदियाळी

संघाच्या सरचिटणीसपदाची ४० वर्षांहून अधिक काळ जबाबदारी सांभाळणारे श्रीरंग इनामदार यांना १९७५ मध्ये अर्जुन हा राष्ट्रीय पुरस्कार व शिवछत्रपती पुरस्कार हे दोन्ही पुरस्कार मिळाले. त्याचप्रमाणे त्यांना सर्वोत्तम मार्गदर्शकासाठी राज्य शासनाचा पुरस्कार २००४-०५ मध्ये मिळाला आहे. हे तिन्ही पुरस्कार मिळवणारे या संघाचे एकमेव खेळाडू आहेत. अरविंद पटवर्धन यांना १९९९ मध्ये राज्य क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार मिळाला आहे. राजीव मराठे यांना खेळाडू व प्रशिक्षक असे दोन्ही पुरस्कार मिळाले आहेत. या संघातील ११ खेळाडूंना एकलव्य, तर चार खेळाडूंना अभिमन्यू हे पुरस्कार मिळाले आहेत. १७ खेळाडूंनी आतापर्यंत शिवछत्रपती पुरस्कार मिळवला आहे.

नेरुरकर चषकावर हुकमत

खो-खो खेळात भाई नेरुरकर स्पर्धा अतिशय प्रतिष्ठेची मानली जाते. या स्पर्धेत नवमहाराष्ट्र संघाने दोन वेळा विजेतेपदांची हॅट्ट्रिक करीत एकूण आठ वेळा त्यावर आपली मोहोर उमटवली आहे. त्याचप्रमाणे उपकनिष्ठ, कुमार व वरिष्ठ अशा तीन विभागांमध्ये नवमहाराष्ट्र संघाच्या खेळाडूंनी २९ वेळा महाराष्ट्राचे कर्णधारपद भूषवले आहे.

खेळाडूंना विमा व आहार सवलत

खेळाडू आणि दुखापती यांचे अतूट नाते असते. हे लक्षात घेऊनच या संघाने जे खेळाडू सलग तीन वर्षे क्लबमध्ये सराव करतात अशा खेळाडूंकरिता एक लाख रुपयांचा वैयक्तिक विमा तसेच एक लाख रुपयांचा अपघात विमा उतरवला आहे. प्रत्येक खेळाडूकरिता पोषक आहार पाहिजे या दृष्टीने क्षिप्रा इनामदार या स्वत:च नियमित आहार तयार करीत असतात. खेळाडूंना हा आहार नि:शुल्क दिला जात असतो.

खेळाबरोबरच शैक्षणिक क्षेत्रातही छाप

अनेक वेळा असे म्हटले जाते की, खेळामुळे अभ्यासावर अनिष्ट परिणाम होतो. मात्र खो-खो खेळाचा नियमित सराव करणाऱ्या या संघातील खेळाडूंनी शैक्षणिक आघाडीवरही हुकमत दाखवली आहे. या संघाचे खेळाडू असलेले डॉ. मधुसूदन झंवर, डॉ. गोविंदराव मराठे, डॉ. सतीश देसाई, डॉ. प्रकाश शेठ, डॉ. समीर जोग, डॉ. गिरीश धडफळे, डॉ. वेधस कोल्हटकर आदी अनेक खेळाडूंनी वैद्यकीय क्षेत्रातही आपला ठसा उमटवला आहे. संघाचे अनेक माजी खेळाडू माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातही अग्रगण्य बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये वरिष्ठ पदावर आहेत, तर काही खेळाडू बँकिंग क्षेत्रात मोठय़ा पदावर काम करीत आहेत.