Gautam Gambhir Targets Australian Team: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या गेलेल्या लॉर्ड्स कसोटी सामन्यात जॉनी बेअरस्टोच्या वादग्रस्त रन आऊटची सर्वत्र चर्चा होत आहे. कसोटीच्या ५व्या दिवशी, बॅटिंगच्या वेळी एक चेंडू टाकल्यानंतर बेअरस्टो त्याच्या क्रीजच्या पुढे गेला. त्याचवेळी यष्टिरक्षक अॅलेक्स कॅरीने त्याला बाद केले. ऑस्ट्रेलियन संघाने अशाप्रकारे धावबाद केल्याने त्यांना संपूर्ण क्रिकेट वर्तुळात टीकेला सामोरे जावे लागत आहे. आता भारताचा माजी खेळाडू गौतम गंभीरनेही कांगारूंवर निशाणा साधला आहे.

जॉनी बेअरस्टोची विकेट हा या सामन्याचा टर्निंग पॉइंट मानला जाऊ शकतो. यानंतरच इंग्लिश कर्णधार बेन स्टोक्सने एका बाजूने आक्रमक फलंदाजी करताना संघाला विजयाच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला, मात्र इंग्लंडचा संघ ३२७ धावांवर आटोपला. बेअरस्टोच्या विकेटनंतर ऑस्ट्रेलियन संघालाही स्टेडियममध्ये उपस्थित प्रेक्षकांच्या रोषाला सामोरे जावे लागले.

जॉनी बेअरस्टोच्या विकेटनंतर गौतम गंभीरने ट्वीट करत ऑस्ट्रेलियन संघावर निशाणा साधला आणि लिहिले की, “अरे स्लेजर्स… खेळाच्या भावनेचा तर्क तुम्हाला लागू होतो की फक्त तो भारतीयांसाठी? खेळभावना फक्त काय आम्हालाच शिकवता का? नेहमीच ऑस्ट्रेलिया रडीचा डाव खेळत असते.” असे म्हणत त्याने जोरदार टीका केली.

बेअरस्टो वादग्रस्तपणे धावबाद झाला

जॉनी बेअरस्टो आपल्या सहकारी फलंदाजाशी बोलण्यासाठी चेंडू खेळल्यानंतर क्रीजच्या बाहेर आला, पण अ‍ॅलेक्स कॅरीने त्याला धावबाद केले. कॅरीची ही कृती नियमानुसार योग्य होती. मात्र, ते खेळाच्या भावनेविरुद्ध होते. आता ऑस्ट्रेलियन संघ या सामन्यात खूप पुढे गेला आहे. आगामी लढतींमध्ये आणखी वाद होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी, बेअरस्टो हा रन आउटचा क्षण कधीच विसरणार नाही. दुसरीकडे सोशल मीडियावर खिलाडूवृत्तीची चर्चा अधिक रंगली आहे. ऑस्ट्रेलियावर नेहमीच रडीचा डाव, चीटिंग असे आरोप होत असतात.

हेही वाचा: Ravindra Jadeja: चर्चा नव्या 3D प्लेयरची! ऑस्ट्रेलियन दिग्गजाने केली ‘या’ पाकिस्तानी खेळाडूची ‘जड्डू’शी तुलना

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सामन्यात काय झाले?

पहिल्या कसोटीनंतर इंग्लंडचा संघाचा सलग दुसरा पराभव झाला. त्यांना सामन्याच्या पाचव्या आणि शेवटच्या दिवशी विजयासाठी २५७ धावा करायच्या होत्या. त्यांच्या हाती सहा विकेट्स होत्या. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडने चार विकेट्स गमावत ११४ धावा केल्या होत्या. बेन डकेट ५० आणि कर्णधार बेन स्टोक्स २९ धावांवर नाबाद होते. दोघांनी पाचव्या विकेटसाठी ६९ धावांची भागीदारी केली होती. तत्पूर्वी, दुसऱ्या डावात इंग्लंडची सुरुवात खराब झाली. ४५ धावांत त्यांचे चार विकेट्स पडल्या होत्या. जो रूट १८, हॅरी ब्रूक ४, जॅक क्रॉली आणि ऑली पोप प्रत्येकी ३-३ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतले होते. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्कने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.