समीर वर्मा, पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल यांचा दुसऱ्या फेरीत प्रवेश

वुहान (चीन) : जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर असलेल्या भारताच्या किदम्बी श्रीकांतचे आशियाई अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान बुधवारी पहिल्याच फेरीत संपुष्टात आले. परंतु समीर वर्मा, पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल यांनी दुसरी फेरी गाठली आहे.

पुरुष एकेरीत इंडोनेशियाच्या शेशार हिरेन रुश्ताव्हिटोने जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर असलेल्या श्रीकांतचा ४४ मिनिटांत २१-१६, २२-२० असा पराभव केला. त्याआधी, जागतिक क्रमवारीत १५व्या स्थानावर असलेल्या समीर वर्माने जपानच्या सकाई काझूमासावर २१-१३, १७-२१, २१-१८ असा संघर्षपूर्ण विजय मिळवला. दुसऱ्या फेरीत त्याची हाँगकाँगच्या लाँग अँगसशी सामना होणार आहे.

महिला एकेरीत ऑलिम्पिक आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक जिंकणाऱ्या सिंधूने जपानच्या ताकाहाशी सायाकाचा सरळ गेम्समध्ये पराभव केला. चौथ्या मानांकित सिंधूने सुरुवातीपासूनच सामन्यावर वर्चस्व राखताना २८ मिनिटांत २१-१४, २१-७ अशा फरकाने विजय मिळवला. दुसऱ्या फेरीत तिची इंडोनेशियाच्या चोयरुनिसाशी गाठ पडणार आहे.

जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानावर असलेल्या सायनाला मात्र चीनच्या हॅन यू हिचा अडथळा ओलांडण्यासाठी कडवा संघर्ष करावा लागला. सातव्या मानांकित सायनाने हॅनवर १२-२१, २१-११, २१-१७ असा रोमहर्षक विजय मिळवला. पुढील सामन्यात तिची दक्षिण कोरियाच्या किम गा ईऊनशी गाठ पडणार आहे.

पुरुष दुहेरीत चीनच्या ही जितिंग आणि टॅन क्विआंग जोडीने भारताच्या एम. आर. अर्जुन आणि रामचंद्रन श्लोक यांचा २१-१८, २१-१५ असा पराभव केला. महिला दुहेरीत जाँगकोलफान किटीथाराकुल व रवींद्र प्रजोंगजाय जोडीने मेघना जक्कमपुडी व पूर्विशा एस. राम यांचा २१-१३, २१-१६ असा पराभव केला.