Asia Cup 2018 Final : भारताने शुक्रवारी झालेल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बांगलादेशला ३ गडी राखून पराभूत केले. शेवटच्या चेंडूवर भारताच्या केदार जाधवने एकेरी धाव काढली आणि सामना जिंकवून दिला. त्याआधी रविंद्र जाडेजा आणि भुवनेश्वर कुमार याने मधल्या फळीत केलेल्या संयमी फलंदाजीच्या केली. या विजयामुळे भारताला आशिया चषकावर सातव्यांदा आपले नाव कोरता आले.

या विजयाबरोबर भारताने तब्बल ५ वर्षाच्या कालावधीनंतर एकदिवसीय स्पर्धात्मक मालिका जिंकली आहे. भारताने या आधी ११ जुलै २०१३ मध्ये कॅरिबियन तिरंगी एकदिवसीय मालिका जिंकली होती. पोर्ट ऑफ स्पेन येथे भारताने श्रीलंकेला १ गडी आणि २ चेंडू राखून विजय पराभूत केले होते. त्यानंतर मात्र भारताला स्पर्धात्मक एकदिवसीय मालिका जिंकता आली नव्हती.

दरम्यान, नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या भारताने बांगलादेशला २२२ धावांमध्ये गुंडाळलं. मात्र धावसंख्येचा पाठलाग करताना भारताचा डाव मधल्या षटकांमध्ये काहीसा गडबडला. रोहित आणि शिखर या सलामीच्या जोडीने भारताला आक्रमक सुरुवात करुन दिली. मात्र शिखर व रायडू माघारी परतल्यानंतर रोहितने दिनेश कार्तिकसोबत छोटेखानी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. मात्र रोहित माघारी परतल्यानंतर धोनी आणि कार्तिक जोडीला धावांची गती राखता आली नाही. अखेर जडेजा-भुवनेश्वर कुमार जोडीची भागीदारी आणि शेवटच्या षटकात केदार जाधव-कुलदीप यादव जोडीची फटकेबाजी यामुळे भारताने सामने जिंकला.