Aamir Kaleem Record Against Team India: आशिया चषक २०२५ स्पर्धेतील साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात ओमानने भारतीय संघाला कडवी झुंज दिली. या सामन्यात भारतीय संघाने ओमानसमोर १८९ धावांचे आव्हान ठेवले होते. भारतीय संघासारखं मजबूत गोलंदाजी आक्रमण असताना या आव्हानाच्या जवळपास पोहोचणं ही देखील मोठी गोष्ट आहे. ओमानला १६७ धावांपर्यंत मजल मारता आली. यासह भारतीय संघाने हा सामना २१ धावांनी आपल्या नावावर केला. दरम्यान ओमानकडून हमद मिर्झा आणि आमिर कलीम यांनी दमदार अर्धशतकं झळकावली. यासह आमिरने ६९ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडून काढला आहे.

ओमानकडून डावाची सुरूवात करण्यासाठी आलेल्या आमिर कलीमने इतिहासाला गवसणी घातली आहे. तो भारतीय संघाविरूद्ध खेळताना कुठल्याही फॉरमॅटमध्ये अर्धशतक झळकावणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. पाकिस्तानमध्ये जन्मलेल्या आणि ओमान संघाचं प्रतिनिधित्व करत असलेल्या आमिर कलीमने हा पराक्रम वयाच्या ४३ व्या (४३ वर्ष ३०३ दिवस) वर्षी करून दाखवला आहे. याआधी हा विक्रम इंग्लंडच्या माजी खेळाडूच्या नावावर होता. वॉली हेमंड यांनी १९४६ मध्ये ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानावर भारतीय संघाविरूद्ध खेळताना ६९ धावांची खेळी केली होती.

कोण आहेत भारतीय संघाविरूद्ध अर्धशतकी खेळी करणारे सर्वात वयस्कर खेळाडू?

४३ वर्ष ३०३ दिवस- आमिर कलीम (ओमान), २०२५
४३ वर्ष ३१ दिवस – वॉली हेमंड (इंग्लंड), १९४६
४१ वर्ष ३५९ दिवस- बॉब सिम्पसन (ऑस्ट्रेलिया), १९७८

यासह त्याने आणखी एक मोठा विक्रम मोडून काढला आहे. आमिर कलीमने या सामन्यात फलंदाजी करताना ६४ धावांची खेळी केली. या खेळीसह तो फुल मेंबर राष्ट्राविरुद्ध खेळताना टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात मोठी खेळी करणारा वयस्कर खेळाडू देखील ठरला आहे. अफगाणिस्तानच्या मोहम्मद नबीने एक दिवसाआधीच श्रीलंकेविरूद्ध खेळताना हा विक्रम आपल्या नावावर केला होता. त्याने ६० धावांची खेळी केली होती. आता हा विक्रम आमिर कलीमच्या नावावर नोंदवला गेला आहे.

टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे वयस्कर खेळाडू

४३ वर्ष ३०३ दिवस – आमिर कलीम विरूद्ध भारत, २०२५
४० वर्ष २६० दिवस- मोहम्मद नबी विरूद्ध श्रीलंका, २०२५
३९ वर्ष १४२ दिवस- तिलकरत्ने दिलशान विरूद्ध पाकिस्तान, २०१६