Pakistan vs Bangladesh: आशिया चषक २०२५ स्पर्धेत गुरुवारी झालेल्या सामन्यात पाकिस्तानने बांगलादेशवर ११ धावांनी विजय मिळवला. बांगलादेशला हा सामना जिंकण्याची सुवर्णसंधी होती. पण फलंदाजांच्या फ्लॉप शो मुळे बांगलादेशला अवघ्या १३६ धावांचं आव्हान देखील गाठता आलेलं नाही. बांगलादेशला २० षटकांअखेर ९ गडी बाद १२४ धावा करता आल्या. हा सामना जिंकून पाकिस्तानने अंतिम फेरीत स्थान मिळवलं आहे. पाकिस्तानचा अंतिम फेरीतील सामना भारतीय संघाविरूद्ध होणार आहे. दरम्यान सामना जिंकूनही पाकिस्तानच्या खेळाडूचा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
क्षेत्ररक्षण करताना चुका करण्यात पाकिस्तानी खेळाडूंचा हात कोणीच धरू शकत नाही. सोपे झेल सोडणं, धावबाद करताना आणि धाव घेताना चुका करणं हे पाकिस्तानच्या खेळाडूंनी अनेकदा केलं आहे. बांगलादेशविरूद्ध झालेल्या सामन्यातही पाकिस्तानच्या फलंदाजांनी परंपरा कायम ठेवली. या सामन्यातही धाव घेताना पाकिस्तानच्या फलंदाजाने असं काही केलं, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
तर झाले असे की, पाकिस्तानची फलंदाजी सुरू असताना १० बांगलादेशकडून मेहदी हसन गोलंदाजी करत होता. तर कर्णधार सलमान अली आगा आणि मोहम्मद हरिस फलंदाजी करत होते. मेहदी हसनने टाकलेल्या चेंडूवर सलमान अलीने लाँगऑनच्या दिशेने शॉट मारला आणि १ धाव घेण्यासाठी धावला. त्याने दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला, पण हरिसने धाव घेण्यास नकार दिला.त्यावेळी लाँगऑनला क्षेत्ररक्षण करत असलेल्या रिशाद हुसेनने क्षेत्ररक्षणात चूक केली. त्यामुळे फलंदाजांना दुसरी धाव घेण्याची संधी मिळाली.पण दुसरी धाव तेव्हाच मिळते जेव्हा पहिली धाव पूर्ण झालेली असते. पाकिस्तानच्या फलंदाजाकडे पहिली धाव पूर्ण करून दुसरी धाव घेण्याची सोपी संधी होती. पण त्याने पहिली धाव पूर्ण केलीच नाही आणि दुसरी धाव घेण्यासाठी धावला. त्यामुळे २ धावा घेऊनही अंपायरने १ धाव घोषित केली.
पाकिस्तानचा अंतिम फेरीत प्रवेश
बांगलादेश आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये झालेला सामना हा सेमीफायनलपेक्षा कमी नव्हता. कारण जो संघ हा सामना जिंकणार त्या संघाला थेट अंतिम फेरीत जाण्याची संधी होती. या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या बांगलादेशला २० षटकांअखेर १३५ धावा करता आल्या. बांगलादेशला हा सामना जिंकण्यासाठी १३६ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना बांगलादेशला १२४ धावांपर्यंत मजल मारता आली. हा सामना पाकिस्तानने ११ धावांनी जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला.