Suryakumar Yadav Meets Oman Cricket Team Players: भारत आणि ओमान या दोन्ही संघांमध्ये आशिया चषक २०२५ स्पर्धेतील साखळी फेरीतील शेवटचा सामना पार पडला. भारतीय संघाने आधीच सुपर ४ मध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे. त्यामुळे या सामन्याचा गुणतालिकेवर फारसा फरक पडणार नव्हता. पण ओमान संघाकडून देखील दमदार खेळ पाहायला मिळाला. नवखा संघ असूनही ओमानने भारतीय संघाला कडवी झुंज दिली. १८९ धावांचा पाठलाग करताना ओमानचा संघ विजयाच्या अगदी जवळ पोहोचला होता. पण शेवटी हा सामना भारताने २१ धावांनी आपल्या नावावर केला. दरम्यान सामना झाल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवने मन जिंकणारी कृती केली आहे.
ओमानचा संघ पहिल्यांदाच आशिया चषक स्पर्धा खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. त्यामुळे हा अनुभव त्यांच्यासाठी नवीन होता. स्पर्धेतील तिन्ही सामने त्यांनी गमावले. पाकिस्तान आणि युएईविरुद्धच्या सामन्यात ओमानचा एकतर्फी पराभव झाला. पण जगातील अव्वल क्रमांकाच्या संघाविरुद्ध खेळताना या संघाने पूर्ण जोर लावला. हा संघ विजयाच्या अगदी जवळ पोहोचला होता. पण शेवटी भारतीय खेळाडूंनी आपल्या अनुभवाचा फायदा घेतला आणि सामना जिंकला.
सूर्यकुमार यादवची मन जिंकणारी कृती
सूर्यकुमार यादवने आधी सर्व खेळाडूंना फलंदाजीला पाठवलं आणि स्वतः बाहेर बसून राहिला. सर्व फलंदाजांना फलंदाजी करण्याची संधी मिळाली. सामना झाल्यानंतर त्याने ओमानच्या खेळाडूंची भेट घेतली. खेळाडूंसोबत फोटो काढले. यासह नवख्या संघातील खेळाडूंना आपला अनुभव सांगितला. यासह खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवला. सूर्यकुमार यादवने केलेल्या या कृत्याचं जोरदार कौतुक होत आहे.
भारतीय संघाचा विजय
या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना २० षटकांअखेर ८ गडी बाद १८८ धावा केल्या. भारताकडून संजू सॅमसनने सर्वाधिक ५६ धावांची खेळ केली. तर अभिषेक शर्माने ३८ धावा केल्या. ओमानला हा सामना जिंकण्यासाठी १८९ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना ओमानकडून आमिर कलीमने सर्वाधिक ६४ धावांची खेळी केली. तर हमद मिर्झाने ५१ धावा केल्या. या दोघांनी ओमानला विजयाच्या जवळ घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. पण ओमानचा संघ विजयापासून २१ धावा दूर राहिला.