Asia Cup 2025 Timings Changed: आशिया चषक २०२५ स्पर्धेला येत्या ९ सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. आगामी टी-२० वर्ल्डकप २०२५ स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर या स्पर्धेचे आयोजन टी-२० फॉरमॅटमध्ये केले जाणार आहे. ८ संघांमध्ये होणाऱ्या या स्पर्धेतील अंतिम सामन्याचा थरार २८ सप्टेंबरला रंगणार आहे. या स्पर्धेचे आयोजन यूएईत केले जाणार आहे. ठरलेल्या वेळापत्रकानुसार, या सामन्यांची सुरूवात संध्याकाळी ७:३० वाजता होणार होती. पण आता या वेळेत केला जाऊ शकतो.

न्यूज २४ ने दिलेल्या वृत्तानुसार, आशिया चषक २०२५ स्पर्धेतील सामन्यांच्या वेळेत बदल केला जाऊ शकतो. हे सामने ७:३० ऐवजी रात्री ८ वाजता सुरू केले जाऊ शकतात. हा निर्णय दुबईतील उष्ण आणि दमट वातावरण पाहता घेतला जाणार असल्याचं म्हटलं जात आहे. ठरलेल्या वेळापत्रकानुसार या स्पर्धेतील सामने संध्याकाळी ७:३० वाजता, तर नाणेफेक ७ वाजता होणार होतं. पण वेळेत बदल झाला, तर नाणेफेक ७:३० वाजता आणि सामन्याची सुरूवात ८ वाजता होऊ शकते. मात्र, आशियाई क्रिकेट परिषदेकडून याबाबत अद्यापही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

आशिया चषकातील पहिला सामना ९ सप्टेंबरला रंगणार आहे. स्पर्धेतील पहिल्या लढतीत अफगाणिस्तान आणि हाँगकाँग हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. या स्पर्धेत भारत, पाकिस्तानसह अफगाणिस्तान , श्रीलंका, बांगलादेश, ओमान, यूएई आणि हाँगकाँग हे ८ संघ आमनेसामने येणार आहेत. या स्पर्धेसाठी ८ संघांना २ गटात विभागण्यात आलं आहे. भारत, पाकिस्तान, ओमान आणि युएई या ८ संघांचा ग्रुप ए मध्ये समावेश करण्यात आला आहे. तर ग्रुप बी मध्ये बांगलादेश, अफगाणिस्तान, श्रीलंका आणि हाँगकाँग यांना स्थान देण्यात आलं आहे.

या स्पर्धेसाठी असा आहे भारतीय संघ:

सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हर्षित सिंह राणा, रिंकू सिंह

राखीव खेळाडू
प्रसिध कृष्णा, ध्रुव जुरेल, यशस्वी जैस्वाल, रियान पराग