Asia Cup, Team India: आशिया चषक २०२५ स्पर्धेला येत्या ९ सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. आगामी टी- २० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आशिया चषक स्पर्धा टी-२० फॉरमॅटमध्ये खेळवली जाणार आहे. ज्यात भारत आणि पाकिस्तान संघाला जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे. पण अफगाणिस्तानलाही हलक्यात घेऊन चालणार नाही. अफगाणिस्तानला युएईत खेळण्याचा चांगलाच अनुभव आहे. अफगाणिस्तानचा श्रीलंका, बांगलादेश आणि हाँगकाँगसोबत ग्रुप बी मध्ये समावेश करण्यात आला आहे.
एकापेक्षा एक फिरकी गोलंदाज असलेल्या अफगाणिस्तान संघाला युएईत खेळण्याचा चांगलाच फायदा होऊ शकतो. आयसीसी वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेचा थरार भारतात पार पडला होता. या स्पर्धेत अफगाणिस्तानने पाकिस्तान, श्रीलंका आणि इंग्लंडसारख्या बलाढ्य संघांना पराभूत केलं होतं. ऑस्ट्रेलियाचा संघ देखील पराभवाच्या अगदी जवळ पोहोचला होता. पण हा सामना थोडक्यात हातून निसटला होता. त्यानंतर टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतही अफगाणिस्तानने दमदार कामगिरी केली. त्यामुळे टी-२० फॉरमॅटमध्ये अफगाणिस्तानने आपली पकड चांगलीच मजबूत केली आहे.
अफगाणिस्तानपासून भारतीय संघाला धोका?
भारतीय संघ या स्पर्धेतील सर्वात मजबूत संघांपैकी एक आहे. पण अफगाणिस्तानचा संघ भारतीय संघाला तोडीस तोड उत्तर देताना दिसून येऊ शकतो. कारण अफगाणिस्तानच्या फिरकी गोलंदाजांना या खेळपट्टीवर खेळण्याचा चांगलाच अनुभव आहे. याआधीही अफगाणिस्तानचा संघ भारतीय संघाला पराभूत करण्याच्या अगदी जवळ पोहोचला आहे, पण पराभूत करू शकलेला नाही. पण बंगळुरूमध्ये झालेल्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात या दोन्ही संघांमध्ये डबल सुपर ओव्हर झाली होती. ज्यात भारतीय संघाने बाजी मारली होती. हा सामना बांगलादेशच्या हातून थोडक्यात निसटला होता. त्यामुळे यावेळी अफगाणिस्तानचा संघ भारतीय संघाला पराभूत करून इतिहास घडवणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
या स्पर्धेतील पहिला सामना अफगाणिस्तान आणि हाँगकाँग या दोन्ही संघांमध्ये होणार आहे. हा सामना ९ सप्टेंबर रोजी खेळवला जाईल. त्यानंतर १६ सप्टेंबरला अफगाणिस्तानचा सामना बांगलादेशविरूद्ध होणार आहे. तर साखळी फेरीतील शेवटचा सामना १८ सप्टेंबरला श्रीलंकेविरूद्ध होणार आहे. जर अफगाणिस्तानचा संघ आपल्या गटात टॉप २ मध्ये पोहोचला, तर या संघाचा सामना इतर पात्र ठरलेल्या संघांसोबत होईल. जे संघ टॉप २ मध्ये येतील ते जेतेपदासाठी अंतिम फेरीत लढतील.