India vs Pakistan, Asia Cup 2025: आशिया चषक २०२५ स्पर्धेतील अंतिम सामना भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये पार पडणार आहे. हा आशिया चषक स्पर्धेचा १७ वा हंगाम आहे. याआधी भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ कधीच अंतिम फेरीत आमनेसामने आले नव्हते. त्यामुळे तब्बल ४१ वर्षानंतर क्रिकेट चाहत्यांना या सामन्याचा थरार पाहायला मिळणार आहे. भारतीय संघाने गेल्या दोन्ही सामन्यात पाकिस्तानचा एकतर्फी धुव्वा उडवला आहे. त्यामुळे भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे. अंतिम सामन्यात पाकिस्तानचा रेकॉर्ड पाहता पाकिस्तानचा संघ देखील भारतीय संघावर भारी पडू शकतो. दरम्यान जाणून घ्या ही स्पर्धा जिंकणाऱ्या संघाला बक्षीस म्हणून किती रक्कम मिळणार?
भारतीय संघाने आशिया चषक २०२५ स्पर्धेत पाकिस्तानला २ वेळा पराभूत केलं आहे. साखळी फेरीत झालेल्या सामन्यात कुलदीप यादवने १८ धावा खर्च करून ३ गडी बाद केले होते. त्यानंतर सुपर ४ फेरीतील सामन्यात अभिषेक शर्मा भारतीय संघाचा विजयाचा हिरो ठरला होता. त्याने ७४ धावांची तुफानी खेळी केली होती. अभिषेक शर्माने संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघासाठी दमदार कामगिरी केली आहे. या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अभिषेक शर्मा अव्वल स्थानी आहे. त्याने आतापर्यंत ३०९ धावा केल्या आहेत. आणखी एक सामना शिल्लक असल्यामुळे तो या धावसंख्येत आणखी भर घालू शकतो.
तर गोलंदाजीत फिरकी गोलंदाज कुलदीप यादवचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना कुलदीप यादवने १३ गडी बाद केले आहेत. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात तो आणखी विकेट्स घेऊन संघाला विजय मिळवून देण्याच्या प्रयत्नात असणार आहे.
विजेत्या संघाला बक्षीस म्हणून किती रक्कम मिळणार?
माध्यमातील वृत्तानुसार , यावेळी आशिया चषक स्पर्धेतील बक्षिसेच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. यावेळी विजेत्या संघाला २.६ कोटी रूपये रक्कम बक्षीस म्हणून दिली जाऊ शकते. तर उपविजेत्या संघाला १.३० कोटी रुपये बक्षीस म्हणून दिले जाऊ शकतात. गेल्यावेळी दिल्या गेलेल्या बक्षिसेच्या रकमेच्या तुलनेत ही रक्कम दुप्पट आहे. मात्र याबाबत एशियन क्रिकेट काउन्सिलकडून कुठलीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
गेल्या वेळी झालेल्या आशिया चषक स्पर्धेत भारताने श्रीलंकेला पराभूत करून जेतेपदाची ट्रॉफी उंचावली होती. या स्पर्धेत विजेत्या भारतीय संघाला बक्षीस म्हणून १.२५ कोटी रुपये मिळाले होते.