दुबई : दोन संघ एकमेकांना कडवी झुंज देतात, एकमेकांशी स्पर्धा करतात, समसमान सामने जिंकतात, तेव्हा त्याला द्वंद्व म्हणणे योग्य ठरते, मात्र दोन संघ समोरासमोर आल्यावर त्यापैकी एकच संघ दरवेळी विजयी होत असेल, तर त्याला द्वंद्व कशाला म्हणायचे? अशा शब्दांत भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने पाकिस्तान संघाला टोला लगावला.
भारतीय संघाने सध्या संयुक्त अरब अमिराती येथे सुरू असलेल्या आशिया चषक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीपाठोपाठ ‘अव्वल चार’ संघांच्या फेरीतही पाकिस्तानवर वर्चस्व गाजवले. पाकिस्तानने दिलेले १७२ धावांचे लक्ष्य भारताने सहा गडी आणि सात चेंडू राखून गाठताना अंतिम फेरीच्या दिशेने भक्कम पाऊल टाकले. ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानविरुद्ध भारताचा हा सलग आठवा विजय ठरला. तसेच उभय संघांत आजपर्यंत एकूण १५ ट्वेन्टी-२० सामने झाले असून यात १२ वेळा भारताने बाजी मारली आहे. याकडे लक्ष वेधत आता दोन संघांमध्ये कोणतीही स्पर्धाच उरलेली नसल्याची टिप्पणी सूर्यकुमारने केली.
‘अव्वल चार’ फेरीतील सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पाकिस्तानच्या एका वरिष्ठ पत्रकाराने दोन संघांतील गुणवत्ता आणि क्षमता यात किती मोठी तफावत आहे, असा प्रश्न सूर्यकुमारला विचारला. यावर हसून उत्तर देताना सूर्यकुमार म्हणाला, ‘‘सर, आता आपण भारत आणि पाकिस्तान यांच्यात द्वंद्व (रायवलरी) आहे असे म्हणणे आधी बंद केले पाहिजे. दोन संघ एकमेकांविरुद्ध १५ सामने खेळले असतील, त्यापैकी एका संघाने आठ आणि दुसऱ्या संघाने सात सामने जिंकले असतील, तर आपण या दोन संघांत द्वंद्व आहे किंवा स्पर्धा आहे, असे म्हणू शकतो. मात्र, इथे एक संघ १२ सामने जिंकला आहे, तर दुसऱ्या संघाला तीनच विजय मिळवता आले आहेत. मग याला द्वंद्व कसे म्हणायचे?’’
भारताच्या विजयात निर्णायक भूमिका बजावणाऱ्या अभिषेक शर्मा (३९ चेंडूंत ७४ धावा) आणि शुभमन गिल (२८ चेंडूंत ४७) या सलामीवीरांच्या कामगिरीचेही सूर्यकुमारने कौतुक केले. ‘‘अभिषेक आक्रमक आहे, तर गिल शांत आणि संयमी आहे. त्यामुळे हे दोघे एकमेकांना पूरक ठरतात. एक जण मोठे फटके मारत असेल, तर दुसऱ्याने एक-दोन धावांवर भर देत खेळपट्टीवर टिकणे गरजेचे असते. ही गोष्ट हे दोघे चांगल्या पद्धतीने जाणतात. त्यांच्यातील ताळमेळही उत्तम आहे. त्यांनी रचलेल्या शतकी भागीदारीमुळेच आम्हाला विजय मिळवणे सोपे झाले,’’ असे सूर्यकुमारने नमूद केले.
पाकिस्तानी खेळाडूंनी डिवचले -अभिषेक
– आशिया चषकाच्या ‘अव्वल चार’ फेरीत अभिषेक शर्माने फटकेबाज खेळी केली. या खेळीदरम्यान त्याची शाहीन आफ्रिदी आणि हारिस रौफ या पाकिस्तानी गोलंदाजांशी शाब्दिक चकमक झाली. पाकिस्तानच्या खेळाडूंनी आम्हाला (अभिषेक आणि गिलला) डिवचले, त्यामुळे त्यांना प्रत्युत्तर देणे गरजेचेच होते, असे स्पष्टीकरण अभिषेकने सामन्यानंतर दिले.
– ‘‘पाकिस्तानचे खेळाडू विनाकारणच आमच्या अंगावर धावून येत होते आणि आम्हाला काहीतरी बोलत होते. मला हे अजिबातच आवडले नाही. त्यांना उत्तर देणे गरजेचे होते. त्यामुळेच मी आक्रमक शैलीत फलंदाजी करत त्यांचा समाचार घेतला,’’ असे अभिषेकने सांगितले.
– अभिषेकने गिलसह १०५ धावांची सलामी दिली. यंदाच्या आशिया चषकातील ही सर्वोच्च भागीदारी ठरली. अभिषेक आणि गिल हे दोघे पंजाबचेच असून लहानपणीपासूनचे मित्र आहेत. गिलबरोबर फलंदाजी करताना नेहमीच मजा येते, असे अभिषेक म्हणाला. – ‘‘आम्ही शालेय स्तरापासून एकत्र खेळत आहोत. आमच्यात चांगली मैत्री आहे आणि हेच मैदानावरही दिसते. आम्ही या स्पर्धेत मोठी भागीदारी रचू असे वाटले होते. अखेर आम्ही हे यश पाकिस्तानविरुद्ध मिळवले. स्वत:च्या कामगिरीबाबतही मी समाधानी आहे. मी मोठ्या फटक्यांचा खूप सराव करतो. त्यामुळेच मला सामन्यात यश मिळवता येते. लयीत असल्यास मी संघाला सामने जिंकवून देऊ शकतो,’’ असे अभिषेकने सांगितले.