सुलेमानिया (इराक) : भारतीय तिरंदाजांनी आशिया चषक तिरंदाजी स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात मंगळवारी तीन सुवर्ण आणि एक कांस्य अशा एकूण चार पदकांसह आपले खाते उघडले.

महिला विभागाच्या अंतिम फेरीत परनीत कौर, अदिती स्वामी आणि साक्षी चौधरी यांनी कझाकिस्तानचा २०४-२०१ असा पराभव केला. मग पुरुष विभागाच्या अंतिम फेरीत प्रथमेश फुगे, ऋषभ यादव आणि समाधान जावकर यांनी बांगलादेशवर २२४-२१८ असा विजय मिळवला. त्यानंतर समाधानने पुरुषांच्या वैयक्तिक विभागात कझाकस्तानच्या सर्गेई क्रिस्टीचवर १४७-१४५ अशी मात करत कांस्य पदक मिळवले. याशिवाय मिश्र विभागात भारताच्या प्रथमेश आणि परनीत जोडीने कझाकिस्तानच्या अ‍ॅडेल झेक्सेनबिनोवा आणि क्रिस्टीच या जोडीला १५८-१५१ असे नमवून भारताला आणखी एक सुवर्णपदक जिंकून दिले.