विश्वचषक अजिंक्यपद स्पर्धेत स्थान मिळवण्याच्या भारतीय महिला हॉकी संघाच्या आशा गुरुवारी संपुष्टात आल्या. क्वालालम्पूर येथे सुरू असलेल्या आशिया चषक महिला हॉकी स्पर्धेत भारतीय संघाला कोरियाचे आक्रमण थोपवून धरता आले नाही. त्यामुळे उपांत्य फेरीत भारताला १-२ असा पराभव पत्करावा लागला.
कोरियाने सुरुवातीलाच दोन गोल करत भारतावर दडपण आणले होते. रितू राणी हिने दुसऱ्या सत्रात गोल करून भारताला सामन्यात पुनरागमन करून दिले. मात्र कोरियाच्या आक्रमक खेळासमोर भारताचा निभाव लागला नाही. सुरुवातीच्या आघाडीच्या बळावर कोरियाने अंतिम फेरीत धडक मारली.
कोरियाने सुरुवातीपासूनच भारतावर हल्ले चढवत पहिल्या १० मिनिटांतच दोन गोलांची भर घातली होती. कोरियाने हे दोन्ही गोल पेनल्टी कॉर्नरवर लगावले. कोरियाने दुसऱ्याच मिनिटाला आघाडी घेतली होती. सामन्यातील पहिल्याच पेनल्टी कॉर्नरवर चेऊन सेऊल की हिने कोरियासाठी पहिला गोल झळकावला. त्यानंतर नवव्या मिनिटाला कोरियाला आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिळाला. त्याचा फायदा उठवत चेओन इउन बी हिने पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रुपांतर केले. पहिल्या सत्रातील अखेरच्या २५ मिनिटांत भारताने गोल करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. पण कोरियाने भारताचे प्रयत्न यशस्वी होऊ दिले नाहीत.
भारताची अव्वल खेळाडू रितू राणी हिने ४१व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल करत सामन्यात रंगत आणली. भारताला बरोबरी साधण्याच्या बऱ्याच संधी चालून आल्या होत्या. पण गोल करण्यात भारताच्या खेळाडू अपयशी ठरल्या. कोरियाने भक्कम बचाव करत भारताच्या चाली हाणून पाडल्या. भारताला विश्वचषक स्पर्धेत स्थान मिळवण्यासाठी ही स्पर्धा जिंकणे गरजेचे होते.
संग्रहित लेख, दिनांक 27th Sep 2013 रोजी प्रकाशित
आशिया चषक हॉकी : भारतीय महिलांच्या विश्वचषकाच्या आशा संपुष्टात
विश्वचषक अजिंक्यपद स्पर्धेत स्थान मिळवण्याच्या भारतीय महिला हॉकी संघाच्या आशा गुरुवारी संपुष्टात आल्या. क्वालालम्पूर येथे सुरू असलेल्या आशिया चषक महिला हॉकी स्पर्धेत भारतीय संघाला कोरियाचे आक्रमण थोपवून धरता आले नाही.

First published on: 27-09-2013 at 04:40 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Asia cup hockey india women lose to korea 2 1 world cup dreams over