Asia Cup 2025 Points Table Update After IND vs UAE Match: भारताने आशिया चषकातील मोहिमेला दणक्यात सुरूवात केली आहे. भारताने पहिल्याच सामन्यात युएईचा पराभव करत एकतर्फी विजय मिळवला. भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. फलंदाजीला उतरलेल्या युएईने चांगली सुरूवात केली, पण बुमराहच्या ब्रेकथ्रूनंतर कुलदीपची फिरकी आणि शिवम दुबेची भेदक गोलंदाजी युएईवर भारी पडली. भारताच्या विजयानंतर गुणतालिकेचं चित्र कसं आहे, जाणून घेऊया.

भारतीय संघाने गुणतालिकेतही चांगली सुरुवात केली आणि पहिलं स्थान मिळवलं आहे. या विजयामुळे भारतीय संघाला केवळ २ गुण मिळाले नाहीत तर त्यांचा नेट रन रेटही गगनाला भिडला आहे. भारताला या नेट रन रेटसह कोणीच मागे टाकू शकत नाही.

अ गटातील संघ भारत आणि युएई यांच्यात पहिला सामना रंगला, अ गटातील हा पहिलाच सामना होता. तर ब गटातील अफगाणिस्तान आणि हाँगकाँग यांच्यातील सामन्याने स्पर्धेला सुरूवात झाली. भारताने युएईविरूद्ध सामना अपेक्षेपेक्षा सहज जिंकला. कुलदीप यादव आणि शिवम दुबे दोघांनी मिळून ७ विकेट्स घेतले आणि युएईला अवघ्या ५७ धावांवर सर्वबाद केलं.

भारताने युएईने दिलेलं ५८ धावांचं लक्ष्य फक्त ४.३ षटकांत म्हणजेच फक्त २७ चेंडूत गाठलं. अभिषेक शर्मा, शुबमन गिल आणि सूर्यकुमार यादव यांनी वादळी फटकेबाजी केली आणि भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. ४ विकेट्स घेणारा कुलदीप यादव सामन्याचा सामनावीर ठरला.

भारताचा नेट रन रेट पहिल्या सामन्यानंतर गगनाला भिडला

टीम इंडियाने या विजयासह गुणतालिकेत आपलं खातं उघडलं. अ गटातील हा पहिलाच सामना होता, त्यामुळे टीम इंडियाने २ गुणांसह आपल्या गटात पहिलं स्थान मिळवलं. पण फक्त २ गुणच नाही तर टीम इंडियाने नेट रन रेटमध्येही मोठी झेप घेतली. फक्त २७ चेंडूत सामना जिंकल्यामुळे भारताचा नेट रन रेट १०.४८३ झाला, जो क्वचितच कोणताही संघ बरोबरी करू शकेल. त्यामुळे गट टप्प्यात तरी भारताचा संघ पहिल्याच स्थानी कायम राहू शकतो.

भारत आणि यूएई व्यतिरिक्त, या गटात ओमान आणि पाकिस्तान देखील आहेत, जे १२ सप्टेंबर रोजी त्यांचा पहिला सामना खेळतील. पण या दोन्हीपैकी कोणत्याही सामना जिंकल्यास भारतीय संघाचा नेट रन रेट पाहता संघ पहिल्या स्थानी कायम असेल. तर ब गटात अफगाणिस्तानने हाँगकाँगला पराभूत करत पहिलं स्थान गाठलं आहे. अफगाणिस्तान २ गुण आणि ४.७०० च्या नेट रन रेटसह पहिल्या स्थानी आहे.