India Dressing Room Impact Player of The match video: आशिया चषक २०२५च्या पहिल्याच सामन्यात भारताने युएईवर ९ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. कुलदीप यादव आणि शिवम दुबेच्या ७ विकेट्सच्या बळावर भारताने युएईला ५७ धावांवर सर्वबाद केलं. प्रत्युत्तरात अभिषेक शर्माच्या तुफानी खेळीमुळे भारतीय संघाने अवघ्या २७ चेंडूत सामना जिंकला. सामन्यानंतर, बीसीसीआयने इम्पॅक्ट प्लेअर ऑफ द मॅचचा व्हीडिओ शेअर केला आहे. पण कुलदीप यादव किंवा अभिषेक शर्मा दोघांनाही हा पुरस्कार मिळाला नाही. कोण मानकरी ठरला, पाहूया.

वनडे वर्ल्डकप २०२३ पासून इम्पॅक्ट प्लेअर ऑफ द मॅच मेडल देण्यास सुरूवात झाली आहे. मोठ्या स्पर्धांमध्ये प्रत्येक सामन्यानंतर हे मेडल देण्यात येतं. तर मालिकांमध्ये संपूर्ण मालिकेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूला हे मेडल दिलं जातं. वेगवेगळ्या प्रकारे मेडल विजेत्या खेळाडूचं नाव जाहीर केलं जातं. यावेळी आशिया चषकानंतर कसं नाव जाहीर केलं पाहूया.

भारत वि. युएई सामन्याचा कोण ठरला इम्पॅक्ट प्लेअर?

युएईविरूद्ध सामन्यात कुलदीप यादव, शिवम दुबे आणि अभिषेक शर्मा यांनी कमालीची कामगिरी केली आहे. शिवम दुबेला इम्पॅक्ट प्लेअर मेडल देण्यात आलं. मॉर्ने मॉर्केल विजेता घोषित करताना म्हटलं, “शिवमने चांगली गोलंदाजी करत प्रभावी कामगिरी केली.” यानंतर सर्वांनी शिवम दुबेला मेडल मिळाल्याबद्दल दोन शब्द बोलायला सांगितलं. तितक्यात कर्णधार सूर्यकुमार यादव म्हणाला की, “भाऊ, हा नियम आहे, जो इम्पॅक्ट प्लेअर पुरस्कार जिंकेल तो समोर उभा राहून दोन शब्द बोलतो.”

तितक्यात शुबमन गिल म्हणतो, “भाषण देणार आहेस की डान्स करणार तूच ठरव.” तितक्यात कोणीतरी म्हणतं डान्स तर शक्यच नाही आणि शिवम दुबे नाही म्हणत हसत हसत पुढे जातो. सगळे जण शिवम दुबेची मजा मस्करी करताना दिसतात. मेडल मिळाल्यानंतर शिवम दुबे म्हणाला, “मी आज गोलंदाजी करण्याचा आनंद घेतला. मला सामन्यात गोलंदाजी करण्यासाठी उत्सुक होतो. मला गोलंदाजी करण्याची संधी मिळाली, ज्यासाठी मी खूप मेहनत घेतली होती. मोर्नेचे खूप आभार.” हे म्हणताच सगळे जण जोरजोरात चिडवू लागले.

कुलदीप यादवने एका षटकात तीन विकेट्स घेतल्यानंतर शिवम दुबे गोलंदाजीला आला आणि त्याने कमाल केली. शिवम दुबेने २ षटकांत ४ धावा देत ३ विकेट्स घेतल्या आणि संघाच्या विजयाचा पाया रचण्यात मोठी भूमिका बजावली.