Kuldeep Yadav 3 Wickets in Single Over Video: आशिया चषक २०२५ ला भारताने दणक्यात सुरूवात केली. युएईविरूद्ध पहिल्याच सामन्यात भारताच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करत फलंदाजांना मैदानावर टिकू दिलं नाही. भारताच्या सर्वच गोलंदाजांनी उत्कृष्ट गोलंदाजी करत युएईला अवघ्या ५७ धावांवर सर्वबाद केलं. टीम इंडियाचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादवच्या गोलंदाजीने तर कहर केला. त्याने एका षटकात ३ विकेट्स घेत सामना भारताच्या बाजूने फिरवला.

स्टार फिरकी गोलंदाज कुलदीप यादवच्या गोलंदाजीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. कुलदीप वर्षाहून अधिक काळानंतर भारताकडून टी-२० सामना खेळण्याची संधी मिळाली. त्याने या संधीचा पुरेपूर फायदा घेतला आणि फक्त एका षटकात युएई संघाला बॅकफूटवर टाकलं.

कुलदीप यादवचं टी-२० क्रिकेटमधील हे पुनरागमन कमालीचं ठरलं. त्याने यापूर्वी जून २०२४ टी-२० विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अंतिम फेरीत अखेरचा टी-२० सामना खेळला होता. कुलदीप यादवने यूएईविरुद्धच्या पहिल्याच षटकात अतिशय किफायतशीर गोलंदाजी केली आणि फक्त ४ धावा दिल्या.

कुलदीप यादवच्या गोलंदाजीचा कहर

त्यानंतर कुलदीपने त्याच्या दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर राहुल चोप्राची विकेट घेतली. मोठा फटका खेळताना राहुल चोप्रा शुबमन गिलच्या हाती झेलबाद झाला. नंतर, कुलदीप यादवने षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर १ धाव दिली आणि तिसऱ्या चेंडूवर एक डॉट बॉल टाकला. चौथ्या चेंडूवर, त्याने यूएईचा कर्णधार मोहम्मद वसीमला पायचीत करत संघाला महत्त्वाची विकेट मिळवून दिली.

कुलदीपने षटकाच्या शेवटच्या चेंडूवर हर्षित कौशिकला क्लीन बोल्ड करत पॅव्हेलियनमध्ये धाडलं. कुलदीप यादवच्या या जादुई गोलंदाजीमुळे युएईचा निम्मा संघ माघारी परतला. या एका षटकात लागलेल्या धक्क्यांमधून युएईचा संघ सावरू शकला नाही. तर १०वी विकेट घेत कुलदीपने २.१ षटकांत फक्त ७ धावा देत ४ विकेट्स घेतल्या.

कुलदीप यादवने अनोख्या विक्रमात सचिन तेंडुलकरला टाकलं मागे

युएईविरूद्ध सामन्यात ३ विकेट घेतल्यानंतर, कुलदीप यादवने एका खास यादीत महान सचिन तेंडुलकरला मागे टाकलं. आशिया चषकात ३ विकेट्स घेण्याच्या बाबतीत कुलदीप यादवने आता सचिनला मागे टाकलं आहे. सचिन तेंडुलकरने आशिया चषकामध्ये ४ वेळा ३ विकेट्स घेण्याचा विक्रम केला होता. कुलदीपने चौथ्यांदा ही कामगिरी केली आहे. भारतासाठी आशिया चषकामध्ये सर्वाधिक वेळेस ३ विकेट्स घेण्याचा विक्रम रवींद्र जडेजाच्या नावावर आहे. जडेजाने ५ वेळा ३ विकेट्स घेतले आहेत.