Shubman Gill Flick Six Goes Viral: भारतीय संघाने युएईविरूद्ध सामन्यात फक्त २७ चेंडूत विजय मिळवत आशिया चषकाच्या मोहिमेला दणक्यात सुरूवात केली आहे. कुलदीप यादव आणि शिवम दुबेने घेतलेल्या ७ विकेट्सच्या बळावर भारताने युएई संघाला अवघ्या ५७ धावांवर सर्वबाद केलं. कुलदीप यादवने एका षटकात ३ विकेट्स सामना भारताच्या बाजूने फिरवला आणि युएईला पुनरागमनाची संधीच दिली नाही. तर प्रत्युत्तरात गिल आणि अभिषेकने वादळी सुरूवात करत संघाला झटपट विजय मिळवून दिला. भारताच्या फलंदाजीदरम्यान शुबमन गिलने कमालीचा षटकार खेचला. ज्याचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे.
बऱ्याच काळानंतर, शुबमन गिल टीम इंडियाच्या टी-२० संघात परतला आणि पहिल्याच सामन्यात त्याने बॅटने आपला वादळी फॉर्म कायम ठेवला. गिलने ९ चेंडूंमध्ये एक षटकार आणि २ चौकारांसह २० धावांची नाबाद खेळी केली. यादरम्यानचा गिलचा षटकार पाहून सर्वच जण त्याचं कौतुक करत होते. तर पाकिस्तानचा खेळाडू वसीम अक्रमची प्रतिक्रिया व्हायरल होत आहे.
शुबमन गिलला आशिया चषकासाठी भारताच्या टी-२० संघात उपकर्णधार म्हणून स्थान देण्यात आले आहे. दरम्यान त्याला प्लेईंग इलेव्हनमध्ये अभिषेक शर्माबरोबर सलामीला उतरण्याची संधी मिळाली. युएईविरुद्धच्या सामन्यात गिलने अभिषेकसोबत पहिल्या विकेटसाठी ४८ धावांची झटपट भागीदारी रचली.
शुबमन गिलचा फ्लिक अन् चेंडू थेट स्टँड्समध्ये; VIDEO पाहिला का?
गिलने या खेळीदरम्यान पुढे येत युएईचा वेगवान गोलंदाज मोहम्मद रोहिदने टाकलेला चेंडू लेग साईडकडे फ्लिक केला. गिलचा फटका एवढा कमाल होता की चेंडू थेट स्टँडमध्ये षटकारासाठी पोहोचला. दरम्यान, कॉमेंट्री पॅनलमध्ये उपस्थित असलेला वसीम अक्रम हा फटका पाहून खूप उत्साहित झाला आणि त्याने गिलचं कौतुक करत म्हटलं, फक्त एक फ्लिक आणि चेंडू थेट स्टँडमध्ये, अविश्वसनीय शॉट. गिलचा षटकार इतका कलात्मक आणि कमालीचा होता की त्याला यासाठी फार ताकद लावायची गरज नाही असंच दिसतंय. हेच पाहून वसीम अक्रमदेखील चकित झाला.
युएई संघाने सामन्याच्या पहिल्या ६ षटकांत फक्त २ गडी गमावून ४१ धावा केल्या होत्या. पण, कुलदीप यादव आणि शिवम दुबे गोलंदाजी करण्यासाठी आल्यानंतर त्यांनी विकेटची रांगचं लावली. कुलदीपने २.१ षटकांत ४ धावा देत ४ बळी घेतले, तर शिवम दुबेने २ षटकांत ४ धावा देत ३ बळी घेतले. या दोघांव्यतिरिक्त जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्ती यांनीही १-१ विकेट घेतल्या. या विजयासह, टीम इंडिया २ गुणांसह अ गटातील आशिया चषकाच्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचली आहे. तर संघाचा नेट रन रेट गगनाला भिडला आहे.