चीनमधील हांगझोऊ शहरात सप्टेंबरमध्ये होणार्‍या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२३ पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. रॉयटर्स या वृत्तसंस्थेनुसार, आशिया ऑलिम्पिक कौन्सिलचे (ओसीए) कार्यवाहक अध्यक्ष रणधीर सिंग यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. शांघायच्या नैऋत्येस सुमारे १७५ किलोमीटर अंतरावर असलेल्या झेजियांग प्रांताच्या राजधानीत १० ते २५ सप्टेंबर दरम्यान होणार होती. अशियाई क्रीडा स्पर्धेचा हा १९ वा हंगाम आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत ११ हजारांहून अधिक खेळाडू सहभागी होणार होते.

गेल्या आठवड्यापर्यंतआयोजक आणि आशिया ऑलिम्पिक परिषद सप्टेंबरमध्ये ठरल्याप्रमाणे खेळ होतील, असं सांगत होते. भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष नरिंदर बत्रा यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला याची पुष्टी केली होती. मात्र, ओसीएच्या कार्यकारी समितीच्या बैठकीनंतर खेळ पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. २०२३ मधील व्यस्त आंतरराष्ट्रीय वेळापत्रकामुळे आयोजकांनी त्वरित खेळांच्या नवीन तारखा जाहीर केल्या नाहीत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याशिवाय वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्सही पुढे ढकलले जाऊ शकतात. हे गेल्या वर्षी होणार होते, परंतु २०२२ पर्यंत पुढे ढकलण्यात आले होते. यावर्षी, २६ जून ते ७ जुलै दरम्यान, ते चीनमधील पश्चिमेकडील चेंगडू शहरात होणार होते. सुमारे ६ हजार खेळाडू यात सहभागी होणार असल्याचे समजते. स्वित्झर्लंडस्थित इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी स्पोर्ट्स फेडरेशन (FISU) युनिव्हर्सिटी गेम्सचे व्यवस्थापन करते.