भटाला दिली ओसरी..!

आशियाई क्रीडा स्पर्धा ही केवळ आशियाई देशांनी वर्चस्व गाजविण्याची स्पर्धा आहे, मात्र कालांतराने या स्पर्धेत ऑस्ट्रेलियासह ओशेनिया देशांनी मक्तेदारी गाजविल्यास नवल वाटणार नाही.

आशियाई क्रीडा स्पर्धा ही केवळ आशियाई देशांनी वर्चस्व गाजविण्याची स्पर्धा आहे, मात्र कालांतराने या स्पर्धेत ऑस्ट्रेलियासह ओशेनिया देशांनी मक्तेदारी गाजविल्यास नवल वाटणार नाही. अलीकडेच आशियाई ऑलिम्पिक परिषदेने ओशेनियातील देशांना आशियाई इनडोअर क्रीडा स्पर्धेची दारे खुली केली आहेत. हा निर्णय आशियाई स्पर्धाचा दर्जा उंचवावा या हेतूने घेतला असला, तरी भारतासाठी हा निर्णय मारकच ठरणार आहे.
तुर्कमेनिस्तानात २०१७मध्ये आशियाई इनडोअर व मार्शल क्रीडा स्पर्धामध्ये व त्यानंतर २०१७मध्ये दक्षिण कोरियात होणाऱ्या आशियाई हिवाळी क्रीडा स्पर्धामध्ये ओशेनियाच्या देशांना भाग घेण्याची संधी मिळणार आहे. कालांतराने या देशांना आशियाई क्रीडा स्पर्धामध्येही प्रवेश दिला जाण्याची शक्यता आहे. आशियाई स्तरावरील स्पर्धा अधिक रंगतदार होण्यापेक्षाही हा निर्णय राजकीय हेतूने घेतला गेला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आशियाई ऑलिम्पिक परिषदेचे अध्यक्ष अल फहाद अल सबाह यांना आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षपदाची स्वप्ने पडली असावीत. आपण जर ओशेनियातील देशांना आशियाई स्पर्धामध्ये प्रवेश दिला तर हे देश ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षपदासाठी आपल्याला मदत करतील, या उद्देशाने हा निर्णय घेतला गेला असावा.
ओशेनिया विभागात ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड या दोन बलाढय़ देशांसह १४ देशांचा समावेश आहे. गेल्या काही वर्षांमध्ये ऑस्ट्रेलिया हा क्रीडा क्षेत्रात अतिशय वेगाने प्रगती करीत असलेला देश झाला आहे. जलतरण, टेनिस, रोइंग, हॉकी, अ‍ॅथलेटिक्स, जिम्नॅस्टिक्स, सायकलिंग आदी क्रीडा प्रकारांत त्यांच्या खेळाडूंनी लक्षवेधक झेप घेतली आहे. हॉकी हा खेळ तर त्यांच्या नसानसात भिनला आहे. आशियाई स्तरावरच भारताला पदकांसाठी चीन, दक्षिण कोरिया, जपान, बहारिन, कझाकिस्तान आदी अनेक देशांचे आव्हान निर्माण होऊ लागले आहे. ओशेनियाचा प्रवेश झाला, तर भारताला ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड या देशांकडून नवे आव्हान मिळण्याची शक्यता आहे. हे दोन्ही देश राष्ट्रकुल स्पर्धेत भारतासाठी नेहमीच डोकेदुखी ठरले आहेत. ऑस्ट्रेलियाचे खेळाडू ऑलिम्पिकमध्ये जलतरण, अ‍ॅथलेटिक्स, रोइंग, जिम्नॅस्टिक्स, नेमबाजी, हॉकी आदी क्रीडा प्रकारांत वर्चस्व गाजवू लागले आहेत. त्यांच्यापुढे आशियाई स्तरावरच भारताचा निभाव लागणे कठीण होणार आहे.
फुटबॉलमध्ये ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेसाठी भारताला आशिया-ओशेनिया गटातून जावे लागते. तेथे नेहमीच भारतीय संघाला विजय मिळविणे ही दुर्मीळ गोष्ट झाली आहे. डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेतही भारताला आशिया-ओशेनिया गटातूनच जागतिक स्पर्धेत स्थान मिळविण्यासाठी झगडावे लागते. फुटबॉल व टेनिस या दोन्ही क्रीडा प्रकारांमध्ये जपान, चीन, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया या देशांपुढे भारताचा निभाव लागला नाही. सरडय़ाची धाव कुंपणापर्यंतच अशीच भारताची अवस्था या खेळांबाबत दिसून आली आहे.
ऑस्ट्रेलियाने आशियाई देशांमध्ये विशेषत: भारतामधील क्रीडा क्षेत्रात आपले वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. हॉकी, क्रिकेट आदी खेळांमध्ये स्थानिक प्रशिक्षक, फिजिओ, ट्रेनर यांच्याऐवजी ऑस्ट्रेलियन तज्ज्ञांना अधिक प्राधान्य व भावही दिला जात आहे. एवढेच नव्हे तर हॉकी इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे पदही ऑस्ट्रेलियन महिलेकडे देण्यात आले आहे. जर ओशेनियाद्वारे त्यांना अधिकृतरीत्या आशियाई क्रीडा स्पर्धेत संधी मिळाली, तर त्यांना स्वत:कडे असलेल्या क्रीडा सुविधा, साधनांसाठी हक्काची बाजारपेठ मिळणार आहे. साहजिकच भारताबरोबरच अनेक आशियाई देशांमधील क्रीडा उत्पादने व अन्य साधनांच्या विक्रीवर गदा येण्याची शक्यता नाकारता येत नाही. ओशेनियाला प्रवेश म्हणजे ‘भटाला दिली ओसरी, भट हातपाय पसरी’ अशीच अवस्था होणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Asian olympic council open doors for oceania countries in asian indoor games