KL Rahul Wife Athiya Shetty Post on Husband Century: भारतीय संघाच्या फलंदाजांनी पहिल्या कसोटीत दोन्ही डावांमध्ये चांगली फलंदाजी करत इंग्लंड संघाला मोठ्या धावसंख्येचं आव्हान दिलं आहे. पहिल्या कसोटीत भारताच्या ५ खेळाडूंनी शतक झळकावलं आहे. यासह भारताने इंग्लंडला विजयासाठी ३७१ धावांचं मोठं आव्हान दिलं आहे. दुसऱ्या डावात केएल राहुलने कमालीची फलंदाजी करत शतक झळकावत संघाचा डाव सावरला आहे. या शतकानंतर केएल राहुलच्या पत्नीने त्याच्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे.
दुसऱ्या डावात भारताची सुरूवात फारशी चांगली झाली नाही. भारताने लवकर ३ विकेट्स गमावले होते. पण सलामीला आलेल्या राहुलने संघाचा डाव एका टोकाकडून सावरला. यानंतर ऋषभ पंत आणि केएल राहुलने मोठी भागीदारी रचत भारतीय संघाला ३०० धावांच्या आघाडीपर्यंत पोहोचवले. चौथ्या दिवसाचं पहिलं सत्र फलंदाजीसाठी खूप अवघड होतं. पण पंत आणि राहुलने काळजीपूर्वक फलंदाजी करत विकेट्स राखून ठेवले.
राहुल-पंतने त्यानंतर दुसऱ्या सत्रात आक्रमक फटके खेळत आपली अर्धशतक झळकावली. केएल राहुलने पहिल्या डावातही चांगली फलंदाजी केली होती, पण अर्धशतक झळकावण्यात अपयशी ठरला. पण या डावात तो शतक पूर्ण करूनच माघारी परतला. राहुल २४७ चेंडूत १८ चौकारांसह १३७ धावांची शानदार खेळी करत माघारी परतला. त्याला ब्रायडन कार्सने बोल्ड करत बाद केलं.
केएल राहुलच्या या शतकानंतर त्याची पत्नी अथिया शेट्टी हिने त्याच्यासाठी इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे. अथियाने राहुलसाठी एक स्पेशल मेसेजही स्टोरीमध्ये लिहिला. तिने राहुलचा मैदानातील फोटो शेअर करत ही खेळी खूप खास होती, असं कॅप्शन लिहिलं आहे आणि पुढे हार्ट इमोजीदेखील टाकला आहे. केएल राहुल आणि आथिया शेट्टी नुकतेच एका गोंडस मुलीचे आई-बाबा झाले आहेत. इवारा असं त्यांनी आपल्या लेकीचं नाव ठेवलं आहे. लेकीच्या जन्मानंतर राहुलचं हे पहिलं आंतरराष्ट्रीय शतक होतं.

राहुल एक चांगला फलंदाज असला तरी त्याला भारताच्या कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी नेहमीच संघर्ष करावा लागला. रोहित शर्माच्या कसोटीतून निवृत्तीमुळे तो संघाचा सलामीवीर म्हणून त्याच्या आवडत्या जागी परतला आहे. राहुलचा हॅरी ब्रुकने एक झेल सोडला आणि त्याला एक जीवदान मिळालं, पण त्याशिवाय संपूर्ण सामन्यात तो सहज फलंदाजी करत धावा काढताना दिसला. या खेळीसह, राहुलने गावस्कर आणि द्रविडला मागे टाकलं आहे आणि इंग्लंडमध्ये सर्वाधिक शतकं करणारा भारतीय सलामीवीर फलंदाज बनला.
इंग्लंडमध्ये सर्वाधिक १०० शतकं करणारे भारतीय सलामीवीर
केएल राहुल – ९ सामने, १८ डाव, ३ शतकं
राहुल द्रविड – ३ सामने, ५ डाव, २ शतकं
सुनील गावस्कर – १५ सामने, २८ डाव, २ शतकं
विजय मर्चंट – ६ सामने, ११ डाव, २ शतकं
रवी शास्त्री – ५ सामने, ८ डाव, २ शतकं
यशस्वी जैस्वाल – १ सामना, २ डाव, १ शतक