AUS vs BAN Match Highlights: ऑस्ट्रेलियन संघाने टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये डकवर्थ-लुईस नियमांनुसार सुपर८ च्या पहिल्या सामन्यात बांगलादेशचा २८ धावांनी पराभव करून शानदार सुरुवात केली आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार मिचेल मार्शने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, त्यानंतर बांगलादेश संघाला २० षटकांत केवळ १४० धावांपर्यंत मजल मारता आली. लक्ष्याचा पाठलाग करताना, ऑस्ट्रेलियन संघाचा डाव सुरू असताना अनेक वेळा पावसाने व्यत्यय आणला, परंतु पावसामुळे सामना पूर्णपणे रद्द झाला तोपर्यंत त्यांनी ११.२ षटकांत १०० धावा केल्या होत्या ज्यामुळे ते डीएलएस नियमाप्रमाणे बऱ्याच धावा पुढे होते, ज्यामुळे ऑस्ट्रेलियाने सामना जिंकला.

बांगलादेशविरुद्धच्या या सामन्यातील ऑस्ट्रेलियन संघाच्या कामगिरीबद्दल बोलायचे तर पॅट कमिन्सची गोलंदाजीत चमकदार कामगिरी पाहायला मिळाली, ज्याने आपल्या ४ षटकांच्या स्पेलमध्ये २९ धावा देत ३ विकेट्स घेतल्या, ज्यात त्याने हॅटट्रिक घेण्याचा पराक्रम केला. कमिन्सशिवाय ॲडम झाम्पाने २ तर स्टार्क, स्टॉइनिस आणि मॅक्सवेल यांनी प्रत्येकी १ विकेट घेतला.

हेही वाचा – IND v AFG: भारताच्या विजयानंतर प्लेईंग इलेव्हनवर रोहित शर्माचे मोठे वक्तव्य, म्हणाला; भविष्यातील सामन्यांमध्ये तीन गोलंदाज….

ऑस्ट्रेलियन संघ बांगलादेशने दिलेल्या १४० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला तेव्हा डेव्हिड वॉर्नरने आक्रमक खेळ करत DLS नियमानुसार संघाला धावसंख्येच्या पुढे नेले. या सामन्यात वॉर्नरने ३५ चेंडूत ५३ धावांची नाबाद खेळी खेळली ज्यात ३ षटकार आणि ५ चौकार दिसले. या विजयासह, ऑस्ट्रेलियाने २ फेब्रुवारी पासून आपली विजयी घोडदौड कायम ठेवली आहे, ज्यामध्ये त्याने आतापर्यंत ८ टी-२० सामने जिंकले आहेत.

हेही वाचा – T20 WC 2024 मधील पहिली हॅटट्रिक पॅट कमिन्सच्या नावे, विश्वचषकात ऐतिहासिक कामगिरी करणारा ७वा गोलंदाज

टी-२० विश्वचषक 2२०२४ च्या सुपर८ मधील पहिल्या गटातील गुण तालिकेवर नजर टाकली तर सर्व संघांनी आता प्रत्येकी एक सामना खेळला आहे. यामध्ये ऑस्ट्रेलियन संघ २ गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. ज्यात त्यांचा नेट रन रेट २.४७१ आहे, तर भारतीय संघाने देखील त्यांच्या पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानला पराभूत करून २ महत्त्वाचे गुण मिळवले आहेत आणि सध्या दुसऱ्या स्थानावर आहेत. टीम इंडियाचा नेट रन रेट २.३५० आहे. या गटात अफगाणिस्तानचा संघ तिसऱ्या तर बांगलादेशचा संघ चौथ्या स्थानावर आहे.