अ‍ॅशेस कसोटी मालिका संपल्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या खेळाडूंनी होबार्टमधील हॉटेलमध्ये रात्रभर पार्टी केली आणि गोंधळ घातला. माहितीनुसार, यामुळे पोलिसांना पाचारण करावे लागले. फॉक्स स्पोर्ट्सच्या रिपोर्टनुसार, या पार्टीत इंग्लंडचा कर्णधार जो रूट आणि जेम्स अँडरसन यांच्याशिवाय ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू अ‍ॅलेक्स कॅरी, ट्रॅव्हिस हेड आणि नॅथन लायन यांचा समावेश होता. पोलीस तेथे आल्यावर त्यांची ही पार्टी बंद करण्यात आली होती. त्यांचा एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये रुट, अ‍ॅलेक्स कॅरी, ट्रॅव्हिस हेड आणि नॅथन लायन यांच्यासह चार पोलीस दिसत आहेत. लायन आणि कॅरी अजूनही ऑस्ट्रेलियन कसोटी संघाच्या कपड्यात आहेत. यजमान कांगारू संघाने अ‍ॅशेसमालिकेत इंग्लंडचा ४-० असा पराभव केला. पाहुण्या संघाची कामगिरी अत्यंत खराब होती. व्हिडिओमध्ये, खेळाडूंना मद्यपान थांबवण्यास सांगितले जात आहे. भिंतीवरच्या घड्याळात पहाटे ६.३० वाजले आहेत. रविवारी अ‍ॅशेस मालिका संपल्यानंतर पार्टी करण्यासाठी क्रिकेटपटू रात्रभर जागे राहिल्याचे यावरून दिसून येते.

हेही वाचा – विनोद कांबळीनं ठोकलं अर्धशतक..! सचिननं ‘खास’ फोटो शेअर करत म्हटलं, ‘‘कांबळ्या…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हिडिओमध्ये पोलीस अधिकारी सांगत आहेत, ”खूप आवाज झाला आहे. तुम्हाला आधीच पार्टी थांबवायला सांगितली होती, त्यामुळे आता आम्हाला इथे यावे लागले.” डेली टेलिग्राफच्या वृत्तानुसार, खेळाडूंनी गैरवर्तन केले नाही. तर, गच्चीवर खेळाडू मोठ्या आवाजात संगीत ऐकत होते. या आवाजावरून तक्रार करण्यात आली. तस्मानिया पोलिसांच्या माहितीनुसार, या तक्रारीनंतर अधिकाऱ्यांनी खेळाडूंना क्राउन प्लाझा हॉटेलमधील बारमधून बाहेर काढले.