भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यात श्रेयस अय्यरला मैदानावर गंभीर दुखापत झाल्याने त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे. तिसऱ्या वनडे सामन्यात झेल टिपताना डाव्या बाजूवर पडल्याने त्याच्या पोटाच्या भागाला दुखापत झाली. यानंतर अंतर्गत रक्तस्त्राव होत असल्याने त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं. पण सध्याच्या घडीला त्याची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान एका ऑस्ट्रेलियन खेळाडूच्या मानेला दुखापत झाल्याने त्याला तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

आता, ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथून एका १७ वर्षीय स्थानिक क्रिकेटपटूबद्दल दुःखद बातमी येत आहे. वृत्तानुसार, मंगळवारी संध्याकाळी या तरुण क्रिकेटपटूच्या मानेवर चेंडू लागला. त्यानंतर तो गंभीर जखमी झाला आणि त्याला मोनाश मेडिकल सेंटरमध्ये नेण्यात आलं आणि लाईफ सपोर्टवर ठेवण्यात आलं आहे.

ऑस्ट्रेलियाच्या स्थानिक वृत्तसंस्थेने (७न्यूज) दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास फर्नट्री गली येथील व्हॅली ट्यू रिझर्व्ह येथे ही घटना घडली. १७ वर्षीय खेळाडूला नेटमध्ये सामन्यापूर्वीच्या सराव सत्रादरम्यान चेंडू लागला.

वैद्यकीय मदत पोहोचण्यापूर्वीच, लोकांनी खेळाडूला जवळच्या मोनाश मेडिकल सेंटरमध्ये नेलं, जिथे त्याला ताबडतोब लाईफ सपोर्टवर ठेवण्यात आलं. खेळाडू सध्या त्याच्या आयुष्यासाठी झुंजत आहे.

या घटनेची तुलना ऑस्ट्रेलियाचा माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू फिल ह्युज याच्याशी केली जात आहे. २०१४ मध्ये सिडनी येथे झालेल्या शेफील्ड शील्ड सामन्यादरम्यान, ह्युजच्या मानेवर बाउन्सर लागला आणि तो मैदानावर कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला.

क्रिकेट व्हिक्टोरिया, क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि खेळाडूचे दोन्ही क्लब परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत आणि आवश्यक ते सर्व सहकार्य करत आहेत. खेळाडूसाठी सर्वच जण प्रार्थना देखील करत आहेत.

फलंदाजी करताना मानेला मार लागल्याच्या फिल ह्युजसारख्या आणखी एका घटनेने क्रिकेटमधील सुरक्षा मानकं अपुरी आहेत का याबद्दल एक मोठी चर्चा पुन्हा सुरू केली आहे. सध्याच्या संरक्षण किटच्या बाबतीत, खेळाडूच्या मानेला झाकणाऱ्या हेल्मेटशिवाय दुसरा कोणताही गार्ड नाहीये. आता येत्या काळात आयसीसी आणि एमसीसी या विषयावर काय निर्णय घेणार यावर सर्वांच्या नजरा असतील.