फलंदाजांच्या छोटेखानी फटकेबाज खेळींनंतर लेग-स्पिनर अॅडम झॅम्पाने (२/२८) निर्णायक भूमिका बजावताना ऑस्ट्रेलियाला ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील सामन्यात इंग्लंडवर ३६ धावांनी विजय मिळवून दिला. ऑस्ट्रेलियाचा हा स्पर्धेतील सलग दुसरा विजय ठरला.
बार्बाडोस येथे झालेल्या या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचे आमंत्रण दिल्यानंतर ऑस्ट्रेलियाने २० षटकांत ७ बाद २०१ अशी धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात इंग्लंडला २० षटकांत ६ बाद १६५ धावांचीच मजल मारता आली.
आव्हानाचा पाठलाग करताना कर्णधार जोस बटलर (२८ चेंडूंत ४२) आणि फिल सॉल्ट (२३ चेंडूंत ३७) यांनी इंग्लंडला आक्रमक सुरुवात करून दिली होती. या दोघांनी सात षटकांतच ७३ धावा फलकावर लावल्या होत्या. मात्र, झॅम्पाने आपल्या फिरकीची जादू चालवताना सलग दोन षटकांत या दोघांना माघारी धाडले. त्यानंतर इंग्लंडच्या अन्य फलंदाजांना धावांचा वेग राखता आला नाही. इंग्लंडला अखेरच्या सहा षटकांत केवळ ४१ धावाच करता आल्या. परिणामी त्यांना पराभव पत्करावा लागला. इंग्लंडचा स्कॉटलंडविरुद्धचा पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यामुळे आता दोन सामन्यांनंतर इंग्लंडच्या खात्यावर केवळ एक गुण आहे.
हेही वाचा >>>IND vs PAK: ऋषभने रचला पाया, बुमराहने रचला कळस; भारताचा पाकिस्तानवर चित्तथरारक विजय
ऑस्ट्रेलियाला मात्र विजयी लय कायम राखण्यात यश आले. ऑस्ट्रेलियाने सलामीच्या लढतीत ओमानला नमवले होते. इंग्लंडविरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या एकाही फलंदाजाला अर्धशतक साकारता आले नाही. मात्र, आघाडीच्या फळीतील प्रत्येक फलंदाजाने किमान २५ धावांचा टप्पा ओलांडताना आपले योगदान दिले. डेव्हिड वॉर्नर (१६ चेंडूंत ३९) आणि ट्रॅव्हिस हेड (१८ चेंडूंत ३४) यांनी ऑस्ट्रेलियाच्या डावाची फटकेबाज सुरुवात केली. कामचलाऊ फिरकीपटू विल जॅक्सने टाकलेल्या डावातील दुसऱ्याच षटकात हेडने दोन, तर वॉर्नरने एक षटकार मारला. त्यानंतर डावातील चौथ्या षटकात वॉर्नरने मार्क वूडच्या गोलंदाजीवर तीन षटकार आणि एका चौकाराची आतषबाजी केली. त्यामुळे पाच षटकांच्या आतच ऑस्ट्रेलियाच्या ७० धावा झाल्या होत्या. वॉर्नर आणि हेड सलग दोन षटकांत माघारी परतल्याने ऑस्ट्रेलियाचा संघ अडचणीत सापडण्याची भीती होती. परंतु कर्णधार मिचेल मार्श (२५ चेंडूंत ३५), मार्कस स्टोइनिस (१७ चेंडूंत ३०), ग्लेन मॅक्सवेल (२५ चेंडूंत २८) आणि मॅथ्यू वेड (१० चेंडूंत नाबाद १७) यांनी चांगली फलंदाजी केल्याने ऑस्ट्रेलियाला २०० धावांचा टप्पा ओलांडता आला.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया : २० षटकांत ७ बाद २०१ (डेव्हिड वॉर्नर ३९, मिचेल मार्श ३५, ट्रॅव्हिस हेड ३४; ख्रिास जॉर्डन २/४४, लियाम लिव्हिंगस्टोन १/१५) विजयी वि. इंग्लंड : २० षटकांत ६ बाद १६५ (जोस बटलर ४२, फिल सॉल्ट ३७, मोईन अली २५; पॅट कमिन्स २/२३, अॅडम झॅम्पा २/२८)
‘आयपीएल’मधून माघार घेण्याचा निर्णय योग्यच
ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू अॅडम झॅम्पाने ट्वेन्टी-२० विश्वचषकापूर्वी झालेल्या ‘आयपीएल’मधून माघार घेतली होती. त्याचा राजस्थान रॉयल्स संघात समावेश होता. मात्र, स्पर्धेला सुरुवात होण्यास काही दिवस असताना त्याने ‘आयपीएल’मध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला. आपला निर्णय योग्यच होता, असे इंग्लंडवरील ऑस्ट्रेलियाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावल्यानंतर झॅम्पा म्हणाला. ‘‘मी थकलेला होतो आणि पूर्णपणे तंदुरुस्तही नव्हतो. तसेच कुटुंबाबरोबर वेळ घालवण्याचाही माझा प्रयत्न होता. त्यामुळे मी कामापेक्षा (क्रिकेट) त्यांना प्राधान्य दिले आणि सरावावर लक्ष केंद्रित केले. याचा मला नक्कीच फायदा झाला आहे. आता मी शारीरिकदृष्ट्या उत्तम स्थितीत आहे,’’ असे झॅम्पाने नमूद केले.
● सामनावीर : अॅडम झॅम्पा