ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू फिलिप ह्युजेसला बुधवारी मॅक्सव्हिले या त्याच्या जन्मगावी अखेरचा निरोप देण्यात आला. भारतीय प्रमाणवेळेनुसार, सकाळी ८.३० वाजता सुरू झालेल्या या अंत्यविधींना क्रिकेटविश्वातील अनेक आजी-माजी खेळाडू उपस्थित होते. ह्यूजच्या निधनामुळे ऑस्ट्रेलिया शोकसागरात बुडाला आहे. त्याला निरोप देण्यासाठी पाच हजार चाहते ह्यूजच्या मॅक्‍सविल या गावात पोहचले होते.
ऑस्ट्रेलियातील एका स्थानिक क्रिकेट सामन्यादरम्यान, उसळता चेंडू लागल्यामुळे ह्युजेसच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर दोन दिवसांनी रूग्णालयात त्याचा मृत्यू झाला होता. या दुर्देवी घटनेमुळे भारत आणि ऑस्ट्रेलियमधील चार कसोटी सामन्यांच्या वेळापत्रकामध्येही बदल करण्यात आले होते.
चॅनल नाईन, एबीसी, फेअरफॉक्स रेडियो नेटवर्क या दुरचित्रवाणी चॅनेल्सच्या माध्यमातून फिल ह्यूग्सच्या अंत्यसंस्काराचे थेट प्रक्षेपण देशभरात करण्यात आले होते. याशिवाय, क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या बेवसाईट आणि अॅपवरही थेट प्रक्षेपणाची व्यवस्था करण्यात आली होती.
भारतीय क्रिकेट संघातर्फे विराट कोहली, रोहित शर्मा, मुरली विजय आणि टीम इंडियाचे संचालक रवी शास्त्री, प्रशिक्षक डंकन फ्लेचर आणि व्यवस्थापक अर्शद आयूब ह्युजेसवरील अंत्यसंस्कारावेळी उपस्थित होते. तर, मार्क टेलर, सर रिचर्ड हेडली, ब्रायन लारा, विराट कोहली, रवी शास्त्री, शेन वार्न, माइक हसी, रिकी पाँटिंग, ब्रेट ली, अॅडम गिलक्रिस्ट आणि ग्लेन मॅकग्रा यावेळी उपस्थित होते.

ह्युजेसच्या अंत्यविधीत क्लार्कचाही सहभाग