वृत्तसंस्था, मेलबर्न

Australian Open Tennis Tournament करोना लस न घेतल्याने गतवर्षी ऑस्ट्रेलियातून माघारी परतावे लागलेल्या सर्बियाच्या नोव्हाक जोकेव्हिचने यंदा ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत दमदार पुनरागमन केले. स्पर्धेतील दहाव्या विजेतेपदासाठी उत्सुक असलेल्या जोकोव्हिचने मंगळवारी पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत स्पेनच्या रोबेटरे कॅरबाल्लेस बाएनाला ६-३, ६-४, ६-० असे सहज नमवले. दुसरीकडे, अनुभवी अँडी मरेने इटलीच्या १३व्या मानांकित माटेओ बेरेट्टिनीला पराभवाचा धक्का दिला.जोकोव्हिचला पहिल्या फेरीच्या लढतीत चाहत्यांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हाच त्याच्या विजयापेक्षा लक्षवेधी ठरला. संपूर्ण लढतीदरम्यान स्टेडियम ‘नोला’च्या गजराने गुंजून गेले होते. तसेच सर्बियाचे ध्वजही मोठय़ा प्रमाणावर दिसत होते.

ब्रिटनच्या बिगरमानांकित मरेने आपल्या खेळातील चुणूक नव्याने दाखवताना बेरेट्टिनीचा पाच सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत ६-३, ६-३, ४-६, ६-७ (७-९), ७-६ (१०-६) असा पराभव केला. दुखापतीमधून सावरल्यावर पुनरागमन करणाऱ्या डॉमिनिक थिमला स्पर्धेत थेट प्रवेश देण्यात आला. मात्र, पहिल्याच फेरीत रशियाच्या आंद्रे रुब्लेव्हने थिमवर ६-३, ६-४, ६-२ अशी मात केली. महिला एकेरीच द्वितीय मानांकित ओन्स जाबेऊरला विजयासाठी विजयासाठी तीन सेटपर्यंत झुंजावे लागले. जाबेऊरने तामरा झिदान्सेकचा ७-६ (१०-८), ४-६, ६-१ असा पराभव केला. एलिसे मेर्टेन्सने दोन ग्रँडस्लॅम विजेत्या गार्बिन मुगुरुझाला ३-६, ७-६ (७-३), ६-१ असे नमवले.