आयपीएल स्पर्धेचे उर्वरित सामने यूएईत खेळवले जाणार आहेत. ही स्पर्धा १९ सप्टेंबरपासून सुरु होणार असून ३१ सामने खेळवले जाणार आहे. यासाठी २१ दिवसांचं वेळापत्रक आखण्यात आलं आहे. या २१ दिवसात १० डबलहेडर्स, ७ सिंगल हेडर्स आणि ४ प्लेऑफचे सामने खेळवले जाणार आहे. टी २० विश्वचषकाच्या दोन दिवस आधी ही स्पर्धा संपणार आहे. या स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाचे बहुतांश खेळाडू खेळतील, असं सांगण्यात आलं आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंच याने टीकास्त्र सोडल्यानंतरही खेळाडू आयपीएल २०२१ स्पर्धा खेळण्यास सज्ज आहेत. त्याचबरोबर बीसीसीआयने देखील आयपीएल टीम मालकांना विदेशी खेळाडू येतील, असं आश्वासन दिलं आहे.

आयपीएलपूर्वी ऑस्ट्रेलियाचा वेस्टइंडिज आणि बांगलादेश दौरा आहे. मात्र काही खेळाडूंनी या दौऱ्यातून वैयक्तिक कारण पुढे देत माघार घेतली आहे, अशी माहिती क्रिकबजने दिली आहे. डेविड वॉर्नर, पॅट कमिन्स, ग्लेन मॅक्सवेल, झाय रिचर्डसन, केन रिचर्डसन, मार्कस स्टोयनिस आणि डॅनियल सॅम्सने वेस्टइंडिज आणि बांगलादेश दौऱ्यातून माघार घेतली आहे. वॉर्नर आणि कमिन्स यांनी रणनितीनुसार या दौऱ्यातून माघार घेतली आहे. यूएईत टी २० विश्वचषक असल्याने या खेळाडूंना आयपीएल स्पर्धेत खेळण्याची परवानगी क्रिकेट ऑस्ट्रेलिया देण्याची शक्यता आहे.

Ind Vs Eng: यष्टीचीत झालेल्या शेफालीमुळे आली महेंद्रसिंह धोनीची आठवण!; पाहा व्हिडिओ

बीसीसीआय इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डासोबत संवाद साधत आहे. इंग्लंडच्या खेळाडूंना आयपीएल खेळण्याची परवानगी देण्याची विनंती बीसीसीआयने केली आहे. दुसरीकडे इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने खेळाडूंना आयपीएल खेळण्याची परवानगी नसेल, असं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे या खेळाडूंबाबत १५ जुलैला निर्णय होण्याची शक्यता आहे.