जागतिक अजिंक्यपद अॅथलेटिक्स स्पर्धा
महाराष्ट्राचा प्रतिभावान धावपटू अविनाश साबळेने शुक्रवारी मध्यरात्री राष्ट्रीय विक्रमासह २०२०च्या टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेची पात्रता मिळवली. दोहा येथे सुरू असलेल्या जागतिक अजिंक्यपद अॅथलेटिक्स स्पर्धेत पुरुषांच्या ३००० मीटर स्टीपलचेस शर्यतीच्या अंतिम फेरीत मात्र अविनाशला १३व्या स्थानी समाधान मानावे लागले.
ऑलिम्पिक पात्रतेसाठी ८.२२ मिनिटे अथवा त्याहून कमी अवधीत ही शर्यत पूर्ण करणे अनिवार्य होते. परंतु २५ वर्षीय अविनाशने ८.२१.३७ मिनिटांत ३००० मीटरचे अंतर गाठले. मात्र त्याने स्वत:चाच राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला. दोन दिवसांपूर्वीच त्याने नाटय़मयरीत्या अंतिम फेरी गाठताना ८.२५.२३ मिनिटांत विजयी अंतर कापले होते. या प्रकारात केनियाच्या कॉन्सेलस किप्रुटोने सुवर्ण, इथिओपियाच्या लॅमचा गिरमाने रौप्य, तर मोरोक्कोच्या सुफिआन बक्कलीने कांस्यपदकावर नाव कोरून ऑलिम्पिक पात्रताही मिळवली.
असा घडला अविनाश..
महाराष्ट्रातील बीड जिल्ह्य़ात शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या अविनाशला बालपणापासूनच संघर्षमय परिस्थितीमुळे धावण्याची आवड निर्माण झाली. शाळेचे अंतर घरापासून सहा किलोमीटर लांब असल्याने अविनाशच्या अंगी तेव्हापासूनच चपळता आली. बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो भारतीय सैन्यात भरती झाला. २०१५मध्ये त्याने पहिल्यांदाच क्रॉस कंटी धावण्याच्या शर्यतीत सहभाग नोंदवला. मात्र त्यानंतर प्रशिक्षक अमरीश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने स्टीपसचेस प्रकारावर लक्ष केंद्रत केले. २०१८च्या आशियाई क्रीडा स्पर्धेतून त्याला गुडघ्याच्या दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली, परंतु २०१९च्या आशियाई अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत त्याने रौप्यपदक जिंकून जागतिक स्पर्धेची पात्रता मिळवली आणि आता ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी तो सज्ज झाला आहे.
४ अविनाशने गेल्या वर्षभरात चार वेळा स्वत:चाच राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला. यामध्ये राष्ट्रीय स्पर्धा (सप्टेंबर २०१८), फेडरेशन चषक (मार्च २०१९) आणि दोन वेळा जागतिक स्पर्धेतील विक्रमाचा समावेश आहे.
१ ३००० मीटर स्टीपलचेस शर्यतीत २०२०च्या टोक्यो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेला अविनाश हा भारताचा पहिला पुरुष धावपटू ठरला आहे.
चालण्याच्या शर्यतीत इरफान, देवेंदर अपयशी
शुक्रवारी रात्रीच झालेल्या पुरुषांच्या २० किलोमीटर चालण्याच्या शर्यतीत भारताच्या के. टी. इरफान आणि देवेंदर सिंग यांना अनुक्रमे २७व्या आणि ३६व्या स्थानावर समाधान मानावे लागले.
भारतीय पुरुष आणि महिला रिले संघ पराभूत
पुरुषांच्या आणि महिलांच्या ४ बाय ४०० मीटर धावण्याच्या रिले शर्यतीत भारतीय संघाला अनुक्रमे सातव्या आणि सहाव्या स्थानी समाधान मानावे लागले. त्यामुळे पात्रता फेरीतच भारताचे आव्हान संपुष्टात आले.
पदक कमावण्यासाठी पहिल्या पाच ते सहा खेळाडूंत स्थान मिळवणे माझ्यासाठी फार आव्हानात्मक होते. त्यामुळे मी ऑलिम्पिक पात्रता मिळवण्यावरच लक्ष केंद्रीत केले. शर्यतीच्या सुरुवातीपासूनच माझ्या मनात ऑलिम्पिक पात्रतेचाच विचार सुरू होता.
– अविनाश साबळे