नवी दिल्ली : बी. साईप्रणीतला भारतीय बॅडिमटन संघटनेच्या (बीएआय) निवड चाचणीत पराभवाचा सामना करावा लागला. जागतिक क्रमवारीत १९व्या स्थानी असलेल्या साईप्रणीतला जानेवारीत ओडिशा खुली स्पर्धा जिंकणाऱ्या किरण जॉर्जने २१-२३, २१-११, १६-२१ असे पराभूत केले. यानंतर साईप्रणीतने अंसल यादववर २१-१६, २१-९ अशी मात केली. मात्र, तो ‘२अ’ गटात दुसऱ्या स्थानी राहिला. या निवड चाचणीचे आयोजन राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसह थॉमस आणि उबेर चषक व आशियाई क्रीडा स्पर्धासाठीच्या संघ निवडीसाठी करण्यात आले आहे. साईप्रणीतला पराभूत झाल्यामुळे भारतीय संघातील स्थानापासून वंचित राहावे लागणार आहे.  जागतिक क्रमवारीत अव्वल १५ खेळाडूंमध्ये असलेल्या लक्ष्य सेन आणि किदम्बी श्रीकांतला भारतीय संघात स्थान देण्यात आला आहे.