Babar Azam: येत्या काही दिवसांत चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे सामने खेळवले जाणार आहेत, या आयसीसी स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. तर पाकिस्तानचा संघ घऱच्या मैदानावर सराव करत आहे. मात्र याआधीच संघाचा स्टार फलंदाज बाबर आझमबरोबर एक दुर्दैवी घटना घडली, ज्यामुळे तो हैराण झाला आहे. स्पर्धेच्या तयारीत व्यस्त असलेल्या बाबरची अचानक एक मौल्यवान वस्तू हरवली.

बाबर आझमने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याचा मोबाईल फोन हरवल्याचे सांगितले आहे. पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझमने गुरुवारी ६ फेब्रुवारी रोजी सोशल मीडिया पोस्टद्वारे सर्वांना आश्चर्यचकित केले. बाबर आझमने एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर एक पोस्ट करून आपला मोबाईल हरवल्याचे सांगितले. स्टार फलंदाजाने पोस्टमध्ये म्हटले आहे की, “माझा फोन हरवला आहे आणि सर्व कॉन्टॅक्टही गेले आहेत. मला (फोन) सापडल्यानंतर मी सर्वांशी संपर्क करेन.”

बाबरची पोस्ट पाहून काही चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आणि त्याचा फोन त्याला पुन्हा द्यावा अशी विनंतीही केली, तर बहुतेकांनी स्टार फलंदाजाची फिरकी घेतली. एकदिवसीय क्रिकेटमध्ये मुख्यतः मधल्या फळीतील फलंदाज असलेला बाबर आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सलामीवीर म्हणून नवीन भूमिका पार पडणार आहे.

सध्या बाबरसह संपूर्ण पाकिस्तानी संघ लाहोरमध्ये सराव सामने खेळून चांगला सराव करण्यात व्यस्त आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी पाकिस्तानला तिरंगी मालिकाही खेळायची आहे, ज्यामध्ये त्यांचा सामना दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडशी होणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या काही काळापासून बाबर आझम फार चांगली कामगिरी करू शकलेला नाही. त्यामुळे ही तिरंगी मालिका त्याच्यासाठी महत्त्वाची असणार आहे. गेल्या महिन्यात त्याने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर कसोटी मालिकेत ३ अर्धशतकं झळकावली होती, पण त्याआधी आणि त्यानंतरही त्याची बॅट शांत राहिली. ही मालिकाच नाही तर चॅम्पियन्स ट्रॉफीही बाबरसाठी महत्त्वाची आहे, कारण त्याला गेल्या अनेक आयसीसी स्पर्धांमध्ये सतत अपयशाचा सामना करावा लागला आहे.