Instagram Accounts Of Pakistani Cricketers Blocked: केंद्र सरकारने पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमिवर सोशल मीडियावरील अनेक प्रसिद्ध पाकिस्तानी व्यक्तींवर कारवाई केली आहे. ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाउंट भारतात ब्लॉक केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी भारताकडून पाकिस्तानी क्रिकेटपटूंवरही कारवाई केली करण्यात आली आहे.

शुक्रवारी (२ मे) पाकिस्तानी क्रिकेटपटू बाबर आझम, मोहम्मद रिझवान, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ, शादाब खान आणि नसीम शाह यांच्यासह अनेक सक्रिय खेळाडूंचे इंस्टाग्राम अकाउंट्स भारतात ब्लॉक करण्यात आले आहे. ज्या इन्स्टाग्राम अकाउंट्सवर कारवाई करण्यात आली आहे, त्यामध्ये पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (पीसीबी) अधिकृत अकाउंटचादेखील समावेश आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने वरील इन्स्टाग्राम खात्यांवर जरी कारवाई केली असली तरी, भारताबाबत सातत्याने आक्षेपार्ह विधाने करणाऱ्या शाहिद आफ्रिदीचे इन्स्टाग्रामवरील अकाउंट अजूनही भारतात सक्रिय आहे.

यापूर्वी, अभिनेत्री माहिरा खान, हानिया आमिर आणि अली जफर यांसारख्या अनेक प्रसिद्ध पाकिस्तानी सेलिब्रिटींची अकाउंट्स भारतात ब्लॉक करण्यात आली होती.

त्यापूर्वी, बातम्यांच्या वेबसाइट्स, क्रिकेटपटू आणि कंटेंट क्रिएटर्ससह अनेक पाकिस्तानी अकाउंट्सची यूट्यूब चॅनल्स भारतात ब्लॉक करण्यात आली होती.

पहलगाम दहशतवादी हल्ला

जम्मू आणि काश्मीरमधील लोकप्रिय पर्यटन स्थळ स्थळ असलेल्या पहलगाम खोऱ्यात पाकिस्तानस्थित दहशतवाद्यांच्या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यांनंतर, नरेंद्र मोदी सरकारने पाकिस्तानविरुद्ध अनेक कठोर पाऊले उचलली आहेत. ज्यामध्ये १९६० चा सिंधू जल कराराला स्थगिती आणि भारतात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले आहेत. शिवाय, अटारी-वाघा सीमा देखील बंद करण्यात आली आहे.

भारत-पाकिस्तान क्रिकेटला बीसीसीआयचा विरोध

दरम्यान, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानविरुद्ध कोणतेही द्विपक्षीय क्रिकेट खेळणार नाही, असे स्पष्ट केले होते. २०१२-१३ मध्ये पाकिस्तान मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी भारतात आला होता तेव्हापासून भारत आणि पाकिस्तान यांच्या द्विपक्षीय मालिका झालेली नाही. तर, २००८ मध्ये भारतीय संघ शेवटचा पाकिस्तानला क्रिकेट मालिका खेळण्यासाठी गेला होता. तेव्हापासून भारत आणि पाकिस्तान केवळ आयसीसी स्पर्धांमध्ये आमने-सामने येतात.