पीटीआय, नवी दिल्ली

पुढील वर्ष ऑलिम्पिकचे असल्यामुळे तातडीने कुस्तीच्या स्पर्धा कार्यक्रमांना सुरुवात करावी असे आवाहन ऑलिम्पिक पदकविजेता मल्ल बजरंग पुनियाने सरकारला केले आहे.या वर्षांच्या सुरुवातीला भारतीय कुस्ती महासंघाचे (डब्ल्यूएफआय) तत्कालीन अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्ध झालेल्या आंदोलनापासून देशातील कुस्ती एकदम ठप्प झाली आहे. २०२४ पॅरिस ऑलिम्पिकच्या तयारीकडे कुणीही गांभीर्याने बघत नसल्याचे चित्र आहे. संयुक्त जागतिक कुस्ती संघटनेने (यूडब्ल्यूडब्ल्यू) भारतीय कुस्ती महासंघावर बंदी आणली आहे. त्यानंतर कुस्ती महासंघाच्या निवडणुका झाल्या. मात्र, ‘डब्ल्यूएफआय’ संविधानातील नियमांचे पालन न केल्याने कुस्ती महासंघाच्या नवनिवार्चित कार्यकारिणीला क्रीडा मंत्रालयाने निलंबित केले आहे. त्यामुळे कुस्ती कार्यक्रम नव्याने सुरू होण्याची शक्यता पुन्हा मावळली आहे.

‘‘कुस्तीगिरांना ऑलिम्पिकसाठी तयारी करायची असेल, तर शिबिरांना सुरुवात व्हायला हवी. बंद पडलेल्या राष्ट्रीय स्पर्धाही लवकर होण्याची आवश्यकता आहे. हे सर्व गेले काही महिने बंदच आहे,’’ असे बजरंगने ‘एक्स’वर लिहिले. कुस्ती महासंघाच्या निवडणुकीत वादग्रस्त माजी अध्यक्ष ब्रिजभूषण यांचे निकटवर्तीय संजय सिंह यांची अध्यक्षपदी निवड झाली. याच्या निषेधार्थ बजरंगने आपला ‘पद्मश्री’ पुरस्कार परत केला.

हेही वाचा >>>SA T20 League : आयपीएलसदृश ट्वेन्टी-२० लीगमुळे टेस्ट सीरिज वाऱ्यावर

‘‘ऑलिम्पिक स्पर्धेला आता केवळ सात महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. मात्र, त्याकडे कुणी गांभीर्याने बघत नाही. गेल्या चार ऑलिम्पिक स्पर्धात कुस्तीत भारताने पदक जिंकले आहे. त्यामुळे आता प्रशासकांनी कुस्तीगिरांच्या भविष्याचा विचार करून तातडीने हालचाली करण्याची गरज आहे,’’ असेही बजरंग म्हणाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कुस्ती महासंघाच्या निवडणुकीला आक्षेप घेत बजरंगसह साक्षी मलिक आणि विनेश फोगट यांनी कुस्ती संघटकांना नव्याने आव्हान दिले. पुरस्कार परत करणे आणि निवृत्तीची घोषणा करून या तिघांनी पुन्हा एकदा कुस्तीगिरांच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.