Bangladesh vs Sri Lanka, World Cup 2023: श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू अँजेलो मॅथ्यूजने अरुण जेटली स्टेडियमवर विश्वचषक २०२३च्या सामन्यादरम्यान टाईम आऊट अपील मागे न घेतल्याबद्दल शाकिब-अल-हसन आणि बांगलादेश संघावर टीका केली आहे. सोमवारी दिल्लीत श्रीलंकन डावाच्या २५व्या षटकात बांगलादेशने वेळकाढूपणाचे जेव्हा अपील केले तेव्हा मॅथ्यूज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टाईम आऊट होणारा पहिला क्रिकेटर ठरला.

मैदानावरील पंच रिचर्ड इलिंगवर्थ आणि मारियास इरास्मस यांनी दोनदा शाकिबला अपील मागे घेण्यास विचारले. ते म्हणाले की, “श्रीलंकन फलंदाजाच्या हेल्मेटचा पट्टा तुटलेला असल्याने त्याने वेळ घेतला. त्यामुळे अपील मागे घ्यायचे आहे का?” परंतु शाकिबने अपील मागे घेण्यास नकार दिला, शेवटी पंचांनी मॅथ्यूजला बाद घोषित केले. सामन्यानंतर शाकिब म्हणाला की, “मी आयसीसीच्या सर्व नियमात बसून हे केलं आहे. युद्धात आणि सामन्यात तुम्ही खेळभावना यापेक्षा देश आणि संघाला अधिक प्राधान्य देतात.”

मॅथ्यूजने शाकिब आणि संपूर्ण बांगलादेशवर टीका केली

आयसीसीच्या नियमानुसार, नवीन फलंदाजाला आधीचा फलंदाज बाद झाल्यानंतर दोन मिनिटांत पुढचा चेंडू खेळण्यासाठी तयार राहावे लागते. पंचांनी निर्णय दिला की, “मॅथ्यूजने हेल्मेटचा पट्टा तुटण्यापूर्वी दोन मिनिटांचा टप्पा ओलांडला होता आणि त्यामुळे त्याला आऊट देण्यात आले. मात्र, मॅथ्यूजने आरोप फेटाळला आहे. त्याने उलट घडलेली घटना ही खेळ भावनेला अनुसरून नव्हती असा आरोप केला. त्याने त्याच्या दाव्यांचे समर्थन करण्यासाठी त्याच्याकडे असलेले व्हिडीओ पुरावे सादर केले आहेत.”

श्रीलंकेचा माजी कर्णधार सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत मॅथ्यूज म्हणाला की, शाकिबचे हे ‘लज्जास्पद’ कृत्य असून त्याने क्रिकेट खेळाचा अनादर केला आहे. मला वाटते की त्याने त्याची सदसदविवेकबुद्धी कुठे ठेवली होती, ते माहित नाही. शाकिब आणि बांगलादेश क्रिकेट संघाने खेळभावनेचा अनादर करत विश्वचषकाला गालबोट लावण्याचे काम केले. जर त्यांना असे क्रिकेट खेळायचे असेल तर साहजिकच ते त्या पातळीवर आले आहेत, असे मला वाटते. काहीतरी खूप चुकीचे घडले आहे कारण, जर मला उशीर झाला असता तर मला हेल्मेट बदलण्याआधीच टाईम आऊट म्हणून बाद ठरवण्यात आले असते.”

हेही वाचा: BAN vs SL: बांगलादेशला मोठा धक्का! कर्णधार शाकिब-अल-हसन विश्वचषक २०२३ मधून पडला बाहेर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बांगलादेशने सामना तीन गडी राखून जिंकल्यानंतर मॅथ्यूजने पत्रकारांना पुढे सांगितले, “मला त्या ठिकाणी सांगण्यात आले की, ‘क्रीझवर येण्यासाठी माझी दोन मिनिटे निघून गेली आहेत.’ आयसीसीचा नियम असं सांगतो की, तुम्ही दोन मिनिटांत तयार व्हा आणि मी दोन मिनिटांच्या आधीच तेथे पोहचलो होतो. जवळपास ४५ ते ५० सेकंद तिथे उभा होतो. माझे हेल्मेट तुटल्यानंतर माझ्याकडे अजून पाच सेकंद शिल्लक होते आणि पंचांनी आमच्या प्रशिक्षकांना देखील सांगितले की त्याचे हेल्मेट तुटलेले दिसत आहे. म्हणजे, मी फक्त माझे हेल्मेट मागत होतो. शेवटी एकच म्हणेन की, या लाजिरवाण्या घटनेनंतर मी कधीच त्याचा आदर करणार नाही.”