चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धा

उपांत्य फेरीची दुसरी लढत आज मध्यरात्री लिव्हरपूलशी

लुइस सुआरेझ आणि लिओनेल मेसी यांच्या दमदार कामगिरीमुळे बार्सिलोनाने गेल्या आठवडय़ात चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात लिव्हरपूलचा ३-० असा धुव्वा उडवला होता. त्यामुळे आता मंगळवारी मध्यरात्री रंगणाऱ्या दुसऱ्या सामन्यात तीन गोलांची आघाडी घेतलेला बार्सिलोना संघ अंतिम फेरीच्या उंबरठय़ावर पोहोचला आहे.

बार्सिलोनाचे प्रशिक्षक एर्नेस्टो वाल्वेर्डे यांनी मात्र लिव्हरपूलला कमी लेखण्याची चूक करू नये, असा इशारा खेळाडूंना दिला आहे. ‘‘कोणत्याही प्रतिस्पध्र्याला धूळ चारण्याची क्षमता लिव्हरपूलमध्ये नक्कीच आहे. गेल्या वर्षी उपांत्यपूर्व फेरीत आमच्याकडे तीन गोलची आघाडी होती. तरीही आम्हाला पराभूत व्हावे लागले,’’ असे वाल्वेर्डे म्हणाले. बार्सिलोनाला या सामन्यात औसमाने डेम्बेले याची उणीव जाणवणार आहे.

लिओनेल मेसीची जादू पहिल्या सामन्यात पाहायला मिळाली होती. फ्री-किकवर अप्रतिम गोल करत मेसीने सर्वानाच मंत्रमुग्ध केले होते. मेसी आणि सुआरेझ बहरात आल्यास, अ‍ॅनफिल्ड एरिना येथे रंगणाऱ्या सामन्यात त्यांना रोखण्यासाठी लिव्हरपूलला तारेवरची कसरत करावी लागेल.

 

मोहम्मद सलाहची माघार

लिव्हरपूलला उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्याआधीच मोठा धक्का बसला आहे. लिव्हरपूलचा आघाडीवीर मोहम्मद सलाह याने बार्सिलोनाविरुद्धच्या सामन्यातून माघार घेतली आहे. न्यू कॅसलविरुद्ध शनिवारी झालेल्या इंग्लिश प्रीमियर लीगमधील सामन्यात सलाहच्या डोक्याला जबर दुखापत झाली होती. ‘‘या सामन्यात खेळण्यासाठी तो उत्सुक आहे, पण वैद्यकीयदृष्टय़ा सलाहला खेळवणे धोक्याचे ठरेल. पूर्ण विचाराअंती त्याला न खेळवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे,’’ असे लिव्हरपूलचे प्रशिक्षक जर्गेन क्लोप यांनी सांगितले.

सामन्याची वेळ : मध्यरात्री १२.३० वाजता

थेट प्रक्षेपण : सोनी लिव्ह