एकाच वेळी अनेक जबाबदाऱ्या सांभाळण्यासंदर्भात प्रशासकीय समितीचा प्रस्ताव
नवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू लवकरच एकाच वेळी अनेक जबाबदाऱ्या सांभाळू शकणार आहेत. कारण परस्पर हितसंबंधांचे चक्रव्यूह त्यांना भेदता येणार आहे. कारण भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) प्रशासकीय समितीने या संदर्भातील प्रस्ताव सादर केला आहे.
सध्या ‘बीसीसीआय’च्या घटनेनुसार कोणताही क्रिकेटपटू एकाच वेळी अनेक भूमिका पार पाडू शकत नाही. त्यामुळे भावी अध्यक्ष सौरव गांगुली, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि कपिल देव यांनाही हितसंबंधांच्या नियमाचा फटका बसला. प्रशासकीय समितीने सोमवारी सर्वोच्च न्यायालयात ११वा स्थिती अहवाल सादर केला. यात ‘बीसीसीआय’च्या घटनेमधील कलम क्रमांक ३८मध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. ही सूचना मान्य झाल्यास ‘बीसीसीआय’ किंवा राज्य संघटनांशी दोन वर्षांहून कमी कालावधीचा करारबद्ध खेळाडूंना अनेक जबाबदाऱ्या सांभाळता येऊ शकतील.
‘आयसीसी’च्या स्पर्धामधील बाद फेरीतील पराभव भारताने टाळावा -गांगुली
कोलकाता : ‘आयसीसी’च्या स्पर्धाच्या बाद फेरीतील पराभवाची मालिका भारताने खंडित करावी, अशी सूचना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदाचा उमेदवार सौरव गांगुलीने केली आहे. ‘‘भारताने ‘आयसीसी’च्या स्पर्धामध्ये उपांत्य व अंतिम फेरीचे सामने वगळता गेल्या काही वर्षांत अप्रतिम कामगिरी केली आहे. विराट हे चित्र पालटेल,’’ असे गांगुलीने सांगितले.