सर्वोच्च न्यायालयाच्या लोढा समितीने चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या संघांवर दोन वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) चॅम्पियन्स लीग ट्वेन्टी-२० स्पर्धेसारख्या तोटय़ातील स्पर्धेला गाशा गुंडाळावा लागला आहे. बीसीसीआयने अन्य देशांच्या संघटनांशी चर्चा करून ही स्पर्धा तात्काळ बंद केली आहे. चाहत्यांचा अल्प प्रतिसाद मिळाल्यामुळे ही स्पर्धा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
‘‘या वर्षी ही स्पर्धा सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांमध्ये खेळवण्यात येणार होती. पण ही स्पर्धा तात्काळ बंद करण्याचा निर्णय चॅम्पियन्स लीगच्या संचालन समितीने घेतला आहे. या स्पर्धेसाठी संलग्न असलेल्या क्रिकेट दक्षिण आफ्रिका (सीएसए) आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया (सीए) या दोन्ही संघटनांशी बीसीसीआयने चर्चा करून हा निर्णय जाहीर केला आहे,’’ असे पत्रकात म्हटले आहे.
लोढा समितीने आपल्या निकालामध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघावर दोन वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. चॅम्पियन्स लीगमध्ये चेन्नईचा संघ हा गतविजेता होता आणि काही वेळा त्यांना उपविजेतेपदही पटकावले होते.
‘‘ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या देशांच्या संघटनांना एकत्र घेऊन बीसीसीआयने २००९ साली या स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेला चाहत्यांचा कमी प्रतिसाद असल्यामुळेच ही स्पर्धा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा आमच्यासाठी नक्कीच सोपा नव्हता. जगभरातील खेळाडूंसाठी हे एक उत्तम व्यासपीठ होते,’’ असे बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, ‘‘या स्पर्धेचा गेले सहा वर्षे साऱ्यांनीच आनंद घेतला, पण मैदानाबाहेर चाहत्यांकडून या स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे प्रायोजकांशी चर्चा करून हा कठोर निर्णय आम्हाला घ्यावा लागला. या स्पर्धेसाठी मेहनत घेणाऱ्या सर्वाचे आम्ही आभार मानतो.’’
चॅम्पियन्स लीगला गाशा गुंडाळावा लागल्यामुळे आता मिनी आयपीएल स्पर्धेचेही भवितव्य धोक्यात आल्याचे म्हटले जात आहे. सप्टेंबर महिन्यांत बीसीसीआयने मिनी आयपीएल भरवण्याचे ठरवले होते. पण या स्पर्धेला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद लाभेल का, याबाबत बीसीसीआय संदिग्ध आहे.