BCCI Annual Contract List : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) खेळाडूंबरोबरच्या वार्षिक सेंट्रल कॉन्ट्रॅक्टची घोषणा केली आहे. बीसीसीआयने सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून इशान किशन आणि श्रेयस अय्यरला वगळलं असून दोन्ही खेळाडूंना मोठा दणका दिला आहे. कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा या चार खेळाडूंना ए+ श्रेणीत स्थान देण्यात आलं आहे. या करारांतर्गत ए+ खेळाडूंना बीसीसीआयकडून दर वर्षी सात कोटी रुपये मानधन दिलं जाईल. खेळाडूंना सामन्यांच्या शुल्काव्यतिरिक्त हे पैसे दिले जातात.

किशान, अय्यरसह इतर काही खेळाडूंना या कॉन्ट्रॅक्टमधून वगळलं आहे. चेतेश्वर पुजारा पूर्वी बी श्रेणीत होता. त्याचं नाव या यादीतून वगळण्यात आलं आहे. अजिंक्य रहाणेचं नावही याआधीच वगळण्यात आलं होतं.

ग्रेड ए+

रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीम बुमराह, रवींद्र जडेजा

ग्रेड ए

रवीचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, लोकेश राहुल, शुबमन गिल आणि हार्दिक पांड्या

ग्रेड बी

सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, कुलदीप यादव, अक्षर पटेल, यशस्वी जैस्वाल

ग्रेड सी

रिंकू सिंह, तिलक वर्मा, ऋतुराज गायकवाड, शार्दुल ठाकूर, शिवम दुबे, रवी बिष्णोई, जितेश शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, मुकेश कुमार, संजू सॅमसन, अर्शदीप सिंग, के.एस. भरत, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, रजत पाटीदार

फास्ट बोलिंग कॉन्ट्रॅक्ट

बीसीसीआयच्या निवड समितीने काही जलदगती गोलंदाजांची नावं सुचवली होती. या गोलंदाजांसाठी वेगळी श्रेणी तयार करण्यात आली असून त्यांचादेखील या कॉन्ट्रॅक्टमध्ये समावेश करण्यात आला आहे. यामध्ये आकाश दीप, विजयकुमार विशाक, उम्रान मलिक, यश दयाल आणि विद्वत कावेरप्पा यांना संधी देण्यात आली आहे.

कोणाला वगळलं? कोणाला संधी?

किशान, अय्यरसह इतर काही खेळाडूंना या कॉन्ट्रॅक्टमधून वगळलं आहे. चेतेश्वर पुजारा पूर्वी बी श्रेणीत होता. त्याचं नाव या यादीतून वगळण्यात आलं आहे. तसेच उमेश यादव, शिखर धवन, दीपक हुड्डा आणि युजवेंद्र चहल यांनादेखील या कॉन्ट्रॅक्टमधून वगळलं आहे. तर रिंकू सिंह, तिलक वर्मा, ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे, रवि बिष्णोई, जितेश शर्मा, मुकेश कुमार, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान आणि रजत पाटीदार यांचा पहिल्यांदाच बीसीसीआयने कॉन्ट्रॅक्ट यादीत समावेश केला आहे.

हे ही वाचा >> नील वॅगनर; सळसळत्या चैतन्याची अनुभूती देणारा योद्धा

कोणाला किती रुपये मिळणार?

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ वेगवेगळ्या श्रेणीतल्या खेळाडूंना दरवर्षी ठराविक रक्कम मानधन म्हणून देतं. त्यानुसार A+ श्रेणीतल्या खेळाडूंना दरवर्षी सात कोटी रुपये दिले जातात. A श्रेणीतल्या खेळाडूंना पाच कोटी, B श्रेणीतल्या खेळाडूंना ३ कोटी रुपये आणि C श्रेणीतल्या खेळाडूंना दरवर्षी एक कोटी रुपये दिले जातात. जे खेळाडू क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये नियमितपणे खेळत असतात त्यांचाच ए प्लस श्रेणीत समावेश केला जातो.