ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी भारताच्या पंचतारांकित फिरकी माऱ्यात अश्विनचे पुनरागमन; धवन, चहल यांना डच्चू
नवी दिल्ली : सलामीवीर पृथ्वी शॉ, धडाकेबाज फलंदाज श्रेयस अय्यर आणि अष्टपैलू शार्दूल ठाकूर या मुंबईकरांना संयुक्त अरब अमिराती येथे होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघातून डावलण्यात आले आहे. सलामीवीर शिखर धवन आणि युजवेंद्र चहल यांनाही अनपेक्षित डच्चू मिळाला आहे. बुधवारी जाहीर करण्यात आलेल्या भारताच्या १५ सदस्यीय संघात अनुभवी रविचंद्रन अश्विनसह पंचतारांकित फिरकी माऱ्याची रचना करण्यात आली आहे.
यंदा १७ ऑक्टोबरपासून अमिराती आणि ओमान येथे होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी शार्दूल आणि श्रेयस यांची राखीव खेळाडू म्हणून वर्णी लागली आहे. शार्दूलने नुकत्याच झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीत उत्कृष्ट कामगिरी केली. त्याने या कसोटीच्या दोन्ही डावांत अर्धशतके झळकावली आणि गोलंदाजीतही छाप पाडताना दुसऱ्या डावात रॉरी बर्न्स आणि इंग्लंडचा कर्णधार जो रूटचा अडसर दूर केला. मर्यादित षटकांच्या देशांतर्गत क्रिकेटमधील पृथ्वीची गेल्या वर्षभरातील कामगिरी लक्षवेधी होती. ‘आयपीएल’मध्ये दुखापत झालेल्या आक्रमक श्रेयसची कामगिरी निवड समितीचे लक्ष वेधू शकली नाही.
जसप्रीत बुमरा, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी हे त्रिकूट वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळेल. तसेच अष्टपैलू हार्दिक पंडय़ा हा आणखी एक वेगवान गोलंदाजीचा पर्याय उपलब्ध आहे. अमिरातीमधील खेळपट्टय़ा फिरकीसाठी अनुकूल मानल्या जातात. त्यामुळे अश्विनचे तब्बल चार वर्षांनंतर भारताच्या ट्वेन्टी-२० संघात पुनरागमन झाले आहे. त्याच्यासह रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती आणि राहुल चहर अशी फिरकीची फळी भारताने निवडली आहे. तसेच राखीव यष्टीरक्षक म्हणून ईशान किशनला पसंती देण्यात आली आहे.
धोनी मार्गदर्शकाच्या भूमिकेत!
माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी ट्वेन्टी-२० विश्वचषकात भारतीय संघाच्या मार्गदर्शकाच्या (मेंटॉर) भूमिकेत दिसणार आहे. दोन विश्वचषक विजेत्या धोनीने मागील वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली होती. मात्र, तो पुन्हा भारतीय संघाशी जोडला जाणार आहे. ‘‘ट्वेन्टी-२० विश्वचषकात धोनी भारतीय संघाच्या मार्गदर्शकाची जबाबदारी पार पाडेल. मी त्याच्याशी दुबई येथे चर्चा केली होती. या स्पर्धेत मार्गदर्शकाची भूमिका बजावण्याची त्याने तयारी दर्शवली आहे. त्यानंतर मी माझे सहकारी, कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांच्याशी चर्चा केली. धोनीमुळे भारतीय संघाला फायदा होईल यावर आमचे एकमत झाले,’’ असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह म्हणाले.
भारतीय संघ
’ फलंदाज : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), के. एल. राहुल, सूर्यकुमार यादव
’ यष्टीरक्षक : ऋषभ पंत, ईशान किशन
’ अष्टपैलू : हार्दिक पंडय़ा
’ वेगवान गोलंदाज : जसप्रीत बुमरा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी
’ फिरकीपटू : रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, राहुल चहर
* (राखीव खेळाडू : श्रेयस अय्यर, शार्दूल ठाकूर, दीपक चहर)